राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रवाशांची सेवा करीत असून नफा-तोटय़ाचा विचारही महामंडळाने केलेला नाही. रस्त्यांची दुरावस्था, प्रवाशांची स्वच्छतेबाबतची उदासीनता, अतीदुर्गम भागापर्यंत पोहचण्यात येणाऱ्या अडचणी असे असतानही एसटी वाट काटून सेवा देत आहे, असे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.
सातपूर येथे आ. नितीन भोसले यांच्या प्रयत्नाने १.५० कोटी रुपये खर्चून अद्ययावत बस स्थानक साकारण्यात येणार आहे. या बस स्थानकाचे भूमिपूजन विनायकदादांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विकासात लोकप्रतिनिधी, उद्योगपती, सरकार यांचा जसा वाटा असतो तितकाच कामगारांचा असतो. नितीन भोसले यांनी कामगार कुटुंबियांसाठी अद्यावत बस स्थानक उभारणीचे स्वप्न पाहणे हे कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्तविकात आ. भोसले यांनी आपण केलेल्या कामांची थोडक्यात माहिती दिली. सातपूर व सिडकोतील ९ वी, १० वीच्या १०६१० विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके, विद्यार्थ्यांना संगणक, प्रिंटर्स, तरुणांना व्यायामशाळा, अभ्यासिका, उद्याने, ज्येष्ठांना विरंगुळा सेंटर, सामाजिक सभागृह, रस्ते अशी अनेक विकास कामे केली. मतदारसंघातील १९ प्रभागांमध्ये काम केले. व्हीआयपी कंपनीतील सेवानिवृत्तीचा प्रश्न असो, कामगारांची वेतनवाढ किंवा सुरक्षेचा प्रश्न असो असे विविध प्रश्न सोडविण्यसाठी प्रयत्न केला. सातपूरचे बस स्थानक अद्ययावत करण्यासाठी सातत्याने पाच वर्षे पाठपुरावा केला. एमआयडीसीसह एसटीच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने हा भूमिपूजन सोहळा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सभागृहनेते शशिकांत जाधव, गुलाबराव पाटील, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मधुकर झेंडे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा