संगणक, इंटरनेट युगातही लक्ष्मीपूजनाच्या वेळी ‘रोजमेळ’ नि ‘वहीखाते’ आपले महत्त्व टिकवून आहे! यंदाही दिवाळीत जालना शहरात याचा प्रत्यय आला.
जालना शहर व्यापार-उदिमासाठी पूर्वापार प्रसिद्ध असून येथील दिवाळीतही प्रसिद्ध व्यापारीवर्गात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लक्ष्मीपूजन उत्साहाने साजरे करतात. आता हिशेब व व्यवहारातील अन्य नोंदी संगणकावर करण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. परंतु पूजेसाठी ‘रोजमेळ’ व ‘वहीखाते’ मात्र अनेक व्यापाऱ्यांना लागतेच! ‘रोजमेळ’ म्हणजे व्यापार-उदिमातील दररोजचा व्यवहार लिहिण्याची वही! लाल कापडाचे कव्हर असणारे विशिष्ट आकारातील लांबट ‘रोजमेळ’ दिवाळी पाडव्यानंतर नव्याने लिहिण्याची प्रथा आता तशी अपवादानेच! कारण आता त्यासाठी संगणकाचा वापर बव्हंशी ठिकाणी आहे. दुसरी बाब म्हणजे पूर्वी व्यापाऱ्यांचे आर्थिक वर्ष दिवाळी पाडव्यापासून सुरू व्हायचे. आता आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चचे असते. त्यामुळे ‘रोजमेळ’चे महत्त्व आता त्या अर्थाने राहिले नाही.
‘रोजमेळ’पेक्षा ‘वहीखाते’ किंवा खातेवहय़ा वेगळय़ा असतात. परंतु त्यांची जागाही आता संगणकाने घेतली आहे. परंतु ‘रोजमेळ’ किंवा ‘वहीखाते’ पूजनासाठी लागतेच. त्यावर लिखाणासाठी पूर्वीच्या काळात बोरू व काळी शाई लागायची म्हणून त्यांचेही पूजन होत असे. परंतु या वर्षीच्या दिवाळीतही अनेक व्यापाऱ्यांनी प्रथेचा भाग म्हणून काळी शाई व बोरूची खरेदी करून पूजा केली. जालना शहरात दिवाळीचा उत्साह जसा जाणवला तसा ग्रामीण भागात जाणवला नाही.
राज्यात सर्वात कमी आणि सरासरीच्या निम्माही पाऊस नसलेल्या या जिल्हय़ातील खरिपाचे उत्पादन ५० टक्केही नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर संपूर्ण जिल्हय़ातच आहे. दिवाळीचे चार दिवस कसेबसे साजरे तरी दुष्काळाच्या झळा मात्र पुढे अधिक तीव्र होणार आहेत.
ज्यांचे सर्वस्व केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी ही दिवाळी उत्साहाची नव्हती व ज्यांचे पोट केवळ हातावर अवलंबून आहे त्यांना महागाईमुळे दिवाळी उत्साहात साजरी करणे कठीणच होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा