नवी दिल्लीतील पीडित तरुणीला न्याय मिळावा आणि देशभरातील महिलांना सुरक्षा मिळावी, यामागणीसाठी शुक्रवारी कोल्हापुरातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले होते. पाचवी ते दहावीतील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाले होते. काल महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी काढलेल्या मोर्चानंतर आज शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोर्चा महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारा ठरला. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन केले होते.
नवी दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणासह अलीकडच्या काळात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय प्रमाणात वाढत आहेत. त्याची चर्चा शालेय विद्यार्थ्यांतही होत आहे. बाल मनात याप्रकाराची चिड निर्माण झाली आहे. याचा प्रत्यय आज निघालेल्या मोर्चात पहावयास मिळाला. शहराच्या विविध शाळांत शिकणारे पाचवी ते दहावीतील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी मोर्चात सहभागी होण्यासाठी गांधी मैदानात जमले होते. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक प्रमाणात होती. शाळेचा नामफलक व महिलांना न्याय मिळणाऱ्या मागण्यांचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते. खरी कॉर्नर, बिनखांबीगणेश मंदिर, महाव्दार रोड, पापाची तिकटीमार्गे मोर्चा बिंदू चौकात आला. तेथेच मोर्चाचे विसर्जन झाले.
यानंतर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड, सभापती ए.डी.पोवार, माजी अध्यक्ष डी.बी.पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बी.डी.पाटील, खासगी प्राथमिक सेवक संघाचे अध्यक्ष भरत रसाळे आदींच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांना निवेदन सादर केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा