‘श्रीमंत दामोदरपंत’ या गाजलेल्या आपल्याच नाटकातली गंमत प्रेक्षकांना ठाऊक असूनही त्या नाटकाचा विस्तार करून दिग्दर्शकाने त्याच नावाचा सिनेमा बनविला आहे. धमाल करमणूक करणे इतकाच माफक हेतू असला तरी प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे ठाऊक असलेला दामोदरपंत आत्मविश्वासाने पडद्यावर सादर करण्याचे धाडस दिग्दर्शकाने केले आहे त्यात तो यशस्वीही ठरला आहे. दामोदरपंत व्यक्तिरेखेच्या प्रेमापोटी दिग्दर्शकाने नाटकाचे रूपांतर सिनेमात केले आहे, त्यामुळे दामोदरपंत निखळ आणि निव्वळ करमणूक करण्यात यशस्वी ठरतात.
संध्याकाळी सहा वाजले की दामूच्या अंगात श्रीमंत दामोदरपंत संचारतात आणि मग घरातल्या मंडळींची, वाडय़ातील मंडळींची धांदल उडते. नाटकाच्या मर्यादित अवकाशात वावरणाऱ्या दामोदरपंतांना सिनेमाद्वारे अधिक विस्तृत अवकाश दिग्दर्शकाने प्राप्त करून दिला आहे. मुंबईतील पारंपरिक वाडय़ाची आता चाळ बनली आहे. त्यामुळे संध्याकाळी सहा वाजता दामोदरपंत अवतरले की अण्णा, माई यांच्याबरोबरच अखंड चाळीतील लोकांचीच धांदल उडते. सगळेजण पारंपरिक वेषभूषेत तयार राहतात. गणपत ऊर्फ अण्णा (विजय चव्हाण) यांचा मुलगा दामू थेट श्रीमंत दामोदरपंत (भरत जाधव) बनला की मग अण्णांची खैर नसते. गणपत अशी हाकाटी आली रे आली की अण्णा, माईच नव्हे तर दामूचा मोठा भाऊ विजय, बहीण सुमनपासून अवघे चाळकरी पण घाबरतात आणि श्रीमंत दामोदरपंतांच्या दिमतीला तयार राहतात. दररोज सहा वाजल्यापासून पहाटे सहापर्यंत चाळीचे रूपांतर दामोदरपंतांच्या प्रशस्त महालात होते आणि समस्त चाळकरी नेमून दिल्याप्रमाणे दामोदरपंतांचे चाकर बनतात.
प्रेक्षकांना आवडलेली आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यात ‘फिट्ट’ बसलेली व्यक्तिरेखा नाटकाच्या अवकाशातून रूपेरी पडद्यावर आणूनही धमाल मनोरंजन करण्याचे दिग्दर्शकाचे धाडस यशस्वी ठरले आहे. पडद्यावर दामोदरपंतांची भव्यता पाहणे रंजक ठरते. अण्णांच्या कुटुंबाबरोबरच अवघ्या चाळकऱ्यांनाही दामोदरपंतांविषयी आदर आहे हे दाखविल्यामुळे सहानंतर चाळकरीही दामोदरपंतांच्या दरबारातील मनसबदार बनून त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. मध्यांतरापर्यंत अण्णांची भूमिका करणारे विजय चव्हाण भाव खाऊन जातात. मध्यांतरानंतर धनाच्या लालसेपोटी सुमनशी आपल्या भाच्याचे लग्न लावण्याची खटपट करणारा खलनायक अशा गोष्टी कथानक आणून चित्रपटात रहस्य दिग्दर्शकाने पेरले आहे. त्यामुळे दामोदरपंतांच्या काळात त्यांचे वितुष्ट असलेल्या लखोबांचा नातू नागेश हाही आपले पूर्वज लखोबा यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डाव रचतो असे दाखविल्याने चित्रपट अधिक रंजक झाला आहे. आजच्या मुंबई शहरातला दामोदरपंतांचा वाडा चाळीत रूपांतरीत झाला असला तरी दिग्दर्शकाने महानगरीय जीवनशैली आणि दामोदरपंत यातला जमीनअस्मानाचा फरक फारच ढोबळ मानाने दाखविला आहे. दामोदरपंत अवतरले की धमाल करतात, सगळ्यांची तारांबळ कशी उडते एवढय़ापुरताच लेखक-दिग्दर्शकाने सिनेमा मर्यादित ठेवला आहे. भरत जाधव, विजय चव्हाण यांच्यासह सर्वच कलावंतांनी आपापल्या भूमिका चांगल्या वठविल्या आहेत. पाश्र्वसंगीत, छायालेखन, वेशभूषा, रंगभूषा, सेट् डिझाईन या सिनेमाच्या महत्त्वाच्या बाजूंचा मेळ छान घातल्याने दामोदरपंत निखळ आणि निव्वळ करमणूक करण्यात यशस्वी ठरतात.
कॉट्सटाऊन पिक्चर्स प्रस्तुत
श्रीमंत दामोदरपंत
कथा-संवाद-दिग्दर्शन – केदार शिंदे
पटकथा – ओमकार मंगेश दत्त
कलावंत – भरत जाधव, सुनील बर्वे, विजय चव्हाण, जयराज नायर, अलका कुबल, पियुष रानडे, चैत्राली गुप्ते, मृणाल दुसानीस, अमित चव्हाण, अभिनय सावंत व अन्य.
दामोदरपंतांच्या प्रेमापोटी..
‘श्रीमंत दामोदरपंत’ या गाजलेल्या आपल्याच नाटकातली गंमत प्रेक्षकांना ठाऊक असूनही त्या नाटकाचा विस्तार करून दिग्दर्शकाने त्याच नावाचा सिनेमा बनविला आहे.
आणखी वाचा
First published on: 28-07-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In love of damodar pant