शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाला दिलेल्या शिक्षेचा उल्लेख असलेल्या मूळ पत्रात ‘पाटील’ आणि ‘मराठा’ हे शब्दच नसून भारत इतिहास संशोधक मंडळ मराठय़ांना व पाटलांना बदनाम करत असल्याचा आरोप पुण्याच्या शिवप्रेमी मंडळाने केला आहे.
रांझाच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षेचा उल्लेख असलेले मूळ शिवकालीन पत्र सापडल्याचे इतिहास संशोधक मंडळाच्या अभ्यासकांनी नुकतेच जाहीर केले होते. मूळ पत्रामध्ये ‘बाबाजी बिन भिकाजी गुजर मोकादम’ असा शिक्षा झालेल्या व्यक्तीचा उल्लेख आहे. त्यावरुन ती व्यक्ती गावचा पाटील आणि मराठा नसल्याचे सिद्ध होते, तरीही हे शब्द जाणूनबुजून जोडून पाटलांना आणि मराठय़ांना संशोधन मंडळ बदनाम करीत असल्याचा आरोप शिवप्रेमी मंडळाने केला आहे. तसेच १९२९ सालीच प्रसिद्ध झालेले पत्र नव्याने प्रसिद्ध करण्याची आवश्यकता त्यांना का भासावी आणि आता हे पत्र प्रसिद्ध करण्यामागे संशोधन मंडळाचा दुसरा काही हेतू आहे का, असा प्रश्नही शिवप्रेमी मंडळाने उपस्थित केला आहे.