दोनदा खासदार आणि चारदा आमदार राहिलेल्या जांबुवंतराव धोटे यांची मालमत्ता केवळ ८५ हजार रुपये असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. माजी खासदार या नात्याने आपल्याला मिळणारे निवृत्तीवेतन हीच आपली मालमत्ता असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आपल्या खात्यात केवळ ८५ हजार रुपये जमा असल्याचे धोटे यांनी म्हटले आहे. यवतमाळातील ज्या बंगल्यात धोटे राहतात तो बंगला आणि भूखंड आपल्याला सत्यनारायण अग्रवाल यांनी अनेक वर्षांपासून राहायला दिला आहे. यवतमाळजवळील इजारा येथे आपण जी ओलिताची शेती करतो ती सर्व शेती पुसदच्या माई मुखरे यांनी आपल्या पत्नी माजी आमदार अ‍ॅड. विजया धोटे यांना मुलगी मानून बक्षीस दिली आहे. आपली कोणत्याही प्रकारची स्थावर किंवा जंगम मालमत्ता विदर्भ, महाराष्ट्र किंवा देश परदेशात कुठेही नाही, असे स्पष्टपणे यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे, ७८ वर्षीय जांबुवंतराव धोटे हे १९६२ पासून राजकारणात असून ते यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून चारदा आमदार आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते.
१९९१ च्या आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळमधून अनामत रक्कम जप्त होऊन पराभवही पचवला आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी आता निवडणूक लढवू नये म्हणून पत्नी विजया आणि कन्या क्रांती यांनी विनंती केली तरी स्वतंत्र विदर्भासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय धाटे यांनी घेतल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, अ‍ॅड. विजया धोटे या काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्ष आहेत, तर कन्या अ‍ॅड. क्रांती धोटे राऊत यवतमाळ जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आहेत. राजकीय एकात्मतेचे सर्वोत्तम प्रतीक म्हणजे धोटे कुटुंब असल्याची चर्चा आहे.
धोटे देशातील एकमेव अपवाद
उमेदवाराची संपत्ती किती आहे, याचे जे काही विवरण प्रतिज्ञापत्राच्या आधारे उमेदवाराने दिले असेल त्याची सत्यासत्यता निर्वाचन आयोग स्वत: पुढाकार घेऊन पडताळून पाहत नाही. ज्या कुणाला आव्हान द्यायचे असेल ती व्यक्ती तसे करू शकते, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात वार्ताहरांना सांगितले. चारदा आमदार आणि दोन खासदार राहिलेल्या उमेदवारांजवळ एक लाख रुपये सुद्धा नाहीत, असे देशातील एकमेव उमेदवार म्हणजे जांबुवंतराव धोटे आहेत. आमदार, खासदार होण्यापूर्वी जे कफल्लक होते मात्र, आमदार, खासदार झाल्यावर अब्जोपती झाले, अशी असंख्य उदाहरणे असल्याच्या पाश्र्वभूमीवर जांबुवंतराव धोटे देशात एकमेव अपवाद आहेत.

Story img Loader