शाहरूख खानचा ‘जब तक है जान’ आणि अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाल्यामुळे तिकिटबारीवर कोण कोणावर मात करणार, याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात दोन्ही चित्रपटांनी प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी १० कोटींच्यावर कमाई केली. याशिवाय, या दोन्ही चित्रपटांना तीन दिवस मिळालेला बुकिं गचा आकडा पाहून दोन्ही चित्रपट शंभर कोटींच्यावर उलाढाल करतील आणि त्यामुळे बॉलिवूडची बऱ्याच कालावधीनंतर ‘कोटी-कोटीं’ने बाजी मारेल, असा अंदाज ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. थोडक्यात या दोघांच्या भांडणात दोघांचा तोटा झालेला नाहीच; वर बॉलिवूडचाही फायदा झाला आहे.
‘जब तक है जान’ देशभरात २५०० थिएटर्समधून प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १५.२३ कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. तर अजयचा ‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट २००० थिएटर्समधून प्रदर्शित झाला असून त्यानेही पहिल्याच दिवशी १०.७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांना मिळालेली थिएटर, त्यांना मिळालेले शो पाहता त्यांच्यात कमी-जास्त कुठेही आढळलेले नाही. उलट, दोन्ही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.
एकीकडे ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाला सिंगल थिएटरमधून मोठय़ा प्रमाणावर प्रेक्षकवर्ग मिळाला आहे तर मल्टिप्लेक्सचा प्रेक्षक ‘जब तक है जान’ने ताब्यात घेतला आहे. सुरुवातील ‘जब तक है जान’ने घेतलेली आघाडी पाहता ‘सन ऑफ सरदार’ मागे पडेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता दोन्हीही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे हे दोघेही तिकीटबारीवर यशस्वी चित्रपट आहेत आणि या दोन्ही चित्रपटांच्या कोटय़वधींच्या उलाढालीमुळे बॉलिवुडची यंदाची दिवाळी आधी कधीही नव्हती एवढी जोरदार असेल, असे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांचे म्हणणे आहे.
‘जब तक है जान’ने बाजारपेठेतील आपल्या मक्तेदारीचा फायदा घेत आपल्या चित्रपटाला कमी थिएटर्स दिले म्हणून अजय देवगणने न्यायालयीन लढाई सुरू केली होती. या लढाईमुळे शाहरूख की अजय देवगण, कोण जिंकणार?, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, या दोघांचे भांडण चित्रपट उद्योगाच्या पथ्यावर पडले आहे, असेच ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.
परदेशातही उदंड व्यवसाय!
परदेशातही दोन्ही चित्रपटांना तितकाच उदंड प्रतिसाद मिळतो आहे. ‘जब तक है जान’ने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियात ४४.३३ लाख, इंग्लंडमध्ये १.३८ कोटी आणि अरब देशांमध्ये ३ लाखाच्या वर कमाई केली आहे. तर ‘सन ऑफ सरदार’ने न्यूझीलंडमध्ये अडीच लाख, ऑस्ट्रेलियात ३१.४६ लाख आणि इंग्लंडमध्ये जवळजवळ २५ लाखाच्या वर कमाई केली आहे.
अजय- शाहरूखच्या भांडणात बॉलिवूडचाही लाभ!
शाहरूख खानचा ‘जब तक है जान’ आणि अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित झाल्यामुळे तिकिटबारीवर कोण कोणावर मात करणार, याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात दोन्ही चित्रपटांनी प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी १० कोटींच्यावर कमाई केली.
First published on: 17-11-2012 at 12:02 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In qurral between ajay and sharukh bollywood gets profit