येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्जन नसल्याने या जिल्ह्य़ातील गरीब रुग्णांना जिल्हा शल्यचिकित्सक सरळ सेवाग्राम व नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवर असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या रुग्णांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
वीस लाख लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्य़ातील गरीब रुग्णांचा मुख्य आधार म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे बघितले जाते, परंतु जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्जन नसल्याने शस्त्रक्रियेच्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील बरेच रुग्ण दररोज जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. त्यांच्यावर नियमित उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जनच्या दोन जागा आहेत. यात नियमित सर्जन म्हणून डॉ.भाऊराव उमाटे व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे डॉ. वरगंटीवार कार्यरत आहेत, तर हिंगणघाट येथील डॉ. खेडेकर यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आलेली आहे, मात्र सध्या जिल्हा रुग्णालयात तिन्ही सर्जन गैरहजर असल्याने रुग्णांची मोठीच गैरसोय होत आहे. डॉ. उमाटे व्यक्तीगत कारणांनी, तर डॉ. वरगंटीवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने तेही रजेवर आहेत, तर डॉ. खेडेकर आठवडय़ातून दोन दिवस म्हणजे मंगळवार व बुधवारीच येथे येतात. या दोन दिवसात शस्त्रक्रियेच्या रुग्णांची गर्दी राहात असल्याने ते सुध्दा मोजक्या शस्त्रक्रिया करतात. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
अतिशय गरीब रुग्णांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनुने स्वत:वरची जबाबदारी झटकत सरळ सेवाग्राम किंवा नागपूर मेडिकल कॉलेजला घेऊन जाण्याचा सल्ला देत आहेत. अशावेळी रुग्णांना रुग्णवाहिकेची आवश्यकता असली तर तीही रुग्णालयात राहात नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील पंधरा दिवसात शस्त्रक्रियेचे शेकडो रुग्ण नागपूर मेडिकल कॉलेजला हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन दिवसापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सकांनी शस्त्रक्रियेच्या एका रुग्णाला नागपूरला नेण्यास सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख या नात्याने सर्जनची नियुक्ती करणे किंवा खासगी डॉक्टरांची मदत घेणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, मात्र नागपूरला नेण्याचा सल्ला देऊन ते कर्तव्यातून मुक्त होत आहेत.
मध्यंतरी जिल्हा रुग्णालयात डॉ.अमल पोद्दार व डॉ. वासुदेव निनावे या दोन खासगी सर्जनची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र डॉ. पोद्दार यांनी जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी रुग्णांकडून पैसे घेण्याची बाब उघडकीस येताच त्यांना तात्काळ सेवामुक्त करण्यात आले, तर डॉ. निनावे यांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. अशा वेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी सर्जनची नियुक्ती करण्यास पुढाकार घेण्याऐवजी रुग्ण नागपूरला पाठवत आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता सर्जन नसल्यामुळेच नागपूरला पाठवावे लागत असल्याचे त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.
खासगी सर्जनची नियुक्ती का करत नाही, अशी विचारल्यावर तुमच्याकडे सर्जन असेल तर पाठवून द्या, असे उत्तर त्यांनी दिले.