पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करून शेती केल्यास त्यांची प्रगती होईल. ज्या शेतकऱ्यांना पाण्याचे शास्त्र समजले ते आज प्रगतिशील असल्याचे मत जिल्हाधिकारी एस. टी. टाकसाळे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी टाकसाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, जि. प. सभापती युद्धाजित पंडित आदी उपस्थित होते.
टाकसाळे म्हणाले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांपुढे फळबागा जगविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारच्या सामूहिक शेततळे कार्यक्रमाचा लाभ घेण्यास शेतकऱ्यांनी पुढे यावे. शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झाले आहे. त्यांनी तीन महिन्यांत ते पूर्ण करणे बंधनकारक आहे.  २०१२-१३ या आर्थिक वर्षांसाठी जिल्ह्य़ातील राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा ३ कोटी ९३ लाख ३ हजारांचा वार्षिक कृती आराखडा मंजूर आहे. शेतकऱ्यांनी पाण्याची टंचाई लक्षात घेता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. या साठी सरकार मोठय़ा प्रमाणात अनुदान देत आहे. ठिबक सिंचन पद्धतीमुळे जमिनीची पोत कायम राहत असल्याचे त्यांनी सांगितले.