सोलापूर जिल्हय़ातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या १२६ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यात बहुतांशी तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस या प्रमुख पक्षांतच लढती झाल्या. राष्ट्रवादीने वर्चस्व प्राप्त केल्याचे सांगण्यात आले. काही भागांत काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी, भाजप व सेना यांनी एकत्रित येऊन पॅनेल उभे केले होते. तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या विरोधात इतर पक्ष एकत्र आले होते.
करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीच्या आमदार श्यामल बागल तर माढय़ात आमदार बबनराव शिंदे यांच्या गटाने बाजी मारली. मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील गटाने वर्चस्व कायम राखले. बार्शीत विलक्षण चुरशीच्या लढती झाल्या. यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल व काँग्रेसचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने प्रतिष्ठा पणाला लावली होती.
उत्तर सोलापूर तालुक्यात काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांनी वर्चस्व कायम राखले. कारंबा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार माने यांच्या गटाविरुद्ध राष्ट्रवादीसह भाजप-सेना युतीने एकत्रपणे उमेदवार दिले होते. परंतु आमदार माने यांच्या गटाने बाजी मारली. मात्र या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी आमदार माने यांच्या दबावाला बळी पडून काम पाहिल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी व भाजप-सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. नंतर निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांना भेटून निवेदनही सादर करण्यात आले.

Story img Loader