माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक रविकुमार गिरधारीलाल गुलाटी यांचे जातवैधता प्रमाणपत्र नाशिकच्या जातपडताळणी समितीने अवैध ठरविले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुलाटी यांचे नगरसेवकपद आज जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी रद्द ठरविले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गटाचा एक नगरसेवक पालिकेत कमी झाला आहे.
गुलाटी यांनी प्रभाग क्र. ४ मधून पालिकेची निवडणूक लढविली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जगन्नाथ पवार यांचा ११२ मतांनी पराभव केला होता. गुलाटी यांनी दाखल्यात खाडाखोड करून जातीचा खोटा दाखला मिळविला. त्याच्या आधारे निवडणूक लढविली. पण त्याला पवार यांनी न्यायालयात आव्हान दिले. चौकशीत त्यांचा जातीचा दाखला खोटा असल्याचे आढळून आले. जातपडताळणी समितीने त्यांचा दाखला अवैध ठरविला. त्यानंतर पवार यांनी न्यायालयात धाव घेतली. जातीचा दाखला चार महिन्यापूर्वी अवैध ठरवूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केला म्हणून पवार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
जातपडताळणी रद्द झाल्यानंतर तत्काळ नगरसेवकपद रद्द करावे, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. पण त्याचे पालन झाले नव्हते. आज जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी गुलाटी यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरविले. आता राजेश अलघ, अनिता ढोकणे, मंगल तोरणे, श्याम आडांगळे यांच्या जातीच्या दाखल्यालाही आव्हान देण्यात आले असून त्यांचे नगरसेवकपदही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
जातपडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर गुलाटी यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेत न्यायालयाने मनाई हुकूम दिलेला नाही. त्यामुळे गुलाटी यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. आता उच्च न्यायालयाच्या निकालावर गुलाटी यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा