तालुक्यातील दिघी व गोंधवणी परिसरातील वस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून थैमान घालणारा बिबटय़ा मंगळवारी वन विभागाच्या पिंज-यात अलगद अडकला. रात्री दोनच्या सुमारास बिबटय़ा जेरबंद झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गेल्या दोन दिवसांपासून गोंधवणी व दिघी गावांच्या शिवारानजीक संजय बागूल, देवकर, बाळासाहेब दिघे, रायभान तुपे या वस्त्यांच्या आसपास बिबटय़ाचा वावर वाढला होता. वन परिमंडल अधिकारी पी. एम. जगताप व वनअधिकारी बी. पी. आडसुरे यांनी  घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली असता बाळासाहेब बागूल, बाळासाहेब दिघे, लक्ष्मण लबडे, विलास म्हस्के, गणपत लहाणे आदींनी िपजरा बसविण्याची मागणी केली. त्यानुसार जगताप यांनी आडसुरे यांना तात्काळ या ठिकाणी िपचरा बसविण्याचे आदेश दिले होते.
रात्री दोनच्या सुमारास बिबटय़ा पिंज-यात अडकताच परिसर त्याच्या डरकाळय़ांनी दणाणून गेला. घटनेची वार्ता समजताच गोंधवणी, दिघी, खैरी, श्रीरामपूर येथील नागरिकांनी बिबटय़ा पाहण्यास गर्दी केली. बाळासाहेब दिघे, संजय बागूल आदींनी वनविभागाच्या कर्मचा-यांना याबाबत माहिती दिली. सकाळी वनअधिकारी पी. बी. आडसुरे यांनी सहका-यांसह घटनास्थळी येऊन िपजरा ताब्यात घेतला. दरम्यान, परिसरात आणखी काही बिबटय़ांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या ठिकाणी आणखी िपजरे बसविण्याची मागणी विलास म्हस्के, देवका देवकर, वसंत लबडे, बाजीराव देवकर, उमेश कुलकर्णी आदींनी केले आहे.
आणखी पिंजरा लावणार- आडसुरे
रात्री पकडण्यात आलेल्या बिबटय़ाचे वय सुमारे तीन वर्षे असून त्यास आज संगमनेर येथील सरकारी नर्सरीमध्ये हलविण्यात आले. परिस्थितीची पाहणी करून इतरही भागांत िपजरे लावण्याची व्यवस्था करणार असल्याची माहिती वनअधिकारी पी. बी. आडसुरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा