नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात गोंधळ घातलेल्या नगर जिल्ह्यातील वरिष्ठ महिला पोलीस अधिका-याने अखेर लेखी माफीनामा लिहून देत या विषयावर पडदा टाकला. या महिला अधिका-याने परिचारिकेसही मारहाण केली होती. या परिचारिकेचीही महिला पोलीस अधिका-याला पायधरणी करावी लागली.
याबाबत रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की सटाणा येथील ना. म. सोनवणे महाविद्यालयात पलवीर पाल या सुरक्षारक्षकाने चौघा जणांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघांना जीव गमवावा लागला तर तिस-या जखमीवर नाशिक येथील खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. तेथेच जाऊन या महिला पोलीस अधिका-याने चांगलाच गोंधळ घातला.
या रुग्णावर योग्य तो उपचार होत नसल्याचा आरोप संबधित महिला पोलीस अधिका-याने करून रुगणालय प्रशासनाशी वाद घातला. त्यानंतर परिचारिकेलाही मारहाण केली होती.  
या घटनेनंतर नाशिकचे सहायक पोलीस आयुक्त व सरकारवाडा पोलीस ठाण्यातील अधिका-यांनी रुग्णालयात धाव घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेमुळे संतप्त झालेल्या रुग्णालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला होता. संबंधित महिला पोलीस अधिका-याची चूक लक्षात आल्यानंतर तिने रुग्णालय प्रशासनाकडे वाद न वाढविण्याची विनंती केल्याचे समजते. परंतु रुग्णालयातील कर्मचारी ठाम असल्याने वाद चिघळत होता. अखेर नाशिकमधील काही वरिष्ठ अधिका-यांनी मध्यस्थी केली.  
या महिला पोलीस अधिका-याचा गोंधळ या रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये चित्रबद्ध झाला आहे. त्याची जाणीव होताच या महिला पोलीस अधिका-याने नरमाईची भूमिका घेतली. रुग्णालय प्रशासनानेही एक पाऊल मागे घेत मंगळवारी रात्री उशिरा संबंधित महिला पोलीस अधिका-याने झालेल्या घटनेबद्दल लेखी माफी मागितल्यानंतर या विषयावर पडदा पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा