वादळासारखे आयुष्य जगून गेल्या वर्षी ऐन दिवाळीत अत्यंत दुर्दैवीरित्या अपघाती निधन पावलेल्या आपल्या मित्राच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डोंबिवलीतील त्याच्या बालमित्रांनी सोमवारी, पाडव्याला जोंधळे हायस्कूलमध्ये रक्तदान शिबीर भरवून त्याच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्याच्या नावे एक ट्रस्ट स्थापन करून दर दिवाळीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्पही केला.
गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी नाशिक येथे एक सुळका सर करताना संदीप पाताडे हा मुलुंड येथील गिर्यारोहक मधमाशा चावल्याने १२० फूट दरीत पडून मृत्यू पावला. संदीपच्या कुटुंबियांवर हा फार मोठा आघात होताच, पण त्याचबरोबर त्याच्या मित्रांसाठीही त्याचे असे अचानक जगातून नाहीसे होणे विलक्षण धक्कादायक होते. संदीप डोंबिवलीतील जोंधळे हायस्कूलचा विद्यार्थी. त्यामुळे त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याच्या शाळासोबत्यांनी दिवाळीच्या दिवशीच सोमवारी शाळेत रक्तदान शिबीर आयोजित केले होते. तसेच गिर्यारोहण स्थळांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरविले. संदीप विविध संस्थांच्या गिर्यारोहण मोहिमांत सहभागी होत असे. त्याच्यासोबत गिरीभ्रमण केलेले अनेक मित्रही यावेळी आवर्जून हजर होते. तसेच संदीपची आई आणि बहिणींनीही रक्तदान शिबिरास भेट दिली. ‘थंडर गाईज्’ या संस्थेने यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व गिरिस्थानांची माहिती देणारी एक मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. किल्ला अथवा डोंगरांची नावे, त्याठिकाणी पोहोचण्यासाठी लागणाऱ्या जवळच्या गावात कसे जाल, कोणत्या काळात तिथे जाणे अधिक योग्य, गिरिभ्रमण करताना घ्यावयाची काळजी, तसेच नकाशा आदी तपशील या पुस्तिकेत आहे. संदीपच्या आठवणींचा हा सिलसिला दरवर्षी दिवाळीत कायम ठेवण्याचा निर्धार त्याच्या मित्रांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी ‘संदीप पाताडे फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे.

Story img Loader