‘आवाज कुणाचा? लातूरकरांचा’! या निनादात लातूर फेस्टिव्हलचे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले.
शुक्रवारी सायंकाळी क्रीडासंकुलाच्या मदानावर खासदार जयवंत आवळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने हे उद्घाटन झाले. आमदार अमित देशमुख व वैजनाथ िशदे, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांची उपस्थिती होती. संयोजन समितीचे अध्यक्ष संजय अयाचित, अॅड. मनोहरराव गोमारे, खासदार आवळे व आमदार देशमुख यांची समयोचित भाषणे झाली. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर आधारित ४ मिनिटांची चलचित्रफित या वेळी दाखवण्यात आली. उद्घाटनानंतर तौफिक कुरेशी व नंदेश उमप यांच्या फोक वाद्यवृंदाने धमाल उडवून दिली. टिपरी, लेझीम, ढोल, झांज अशा वाद्यांचा संगम कुरेशी यांनी सादर केला. नंदेश उमप यांनी पहाडी आवाजात गणेशस्तवन सादर करून ‘सुंभरानं मांडिलगा’ गीत म्हटले. ऊर्मिला धनगरने सादर केलेल्या लावणीवर तरुणाई थिरकली.
‘रसयात्रा’त रसिक चिंब
‘रसयात्रा मराठवाडय़ाची’ कार्यक्रमात मराठी सारस्वतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कवी इंद्रजित भालेराव, रंजना कंधारकर, श्रीकांत उमरीकर, गायक विश्वनाथ दाशरथे, तसेच प्रल्हाद शेळके यांच्या बासरीवादनाच्या तालावर पीव्हीआर टॉकीज सभागृहात शब्दोत्सवाची मेजवानी उपस्थितांना भावली. मराठी भाषेच्या जन्माचे गीत, माझी मराठी मराठाच मी, आधी रचिली पंढरी आदी गीतांचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. संत जनाबाईंच्या जात्यावरील ओव्यांना महिलांनी भरभरून दाद दिली. वा. रा. कांत आदी कवींच्या कवितेसह समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक कवींनी शब्दोत्सवात सादर केले. विलास आराध्ये यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश घादगिने यांनी आभार मानले.
मुर्गाप्पा खुमसे, सुमती जगताप,
लता रसाळ आदींचा आज गौरव
सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवून लातूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या व्यक्तींचा लातूर फेस्टिव्हलमध्ये उद्या (रविवारी) सन्मान करण्यात येणार आहे. पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत जीवनगौरव, कार्यगौरव, युवागौरव पुरस्कारांचे वितरण होईल.
सुमती जगताप व मुर्गाप्पा खुमसे यांना गेल्या दोन वर्षांसाठीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने होणाऱ्या लातूर फेस्टिव्हलमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. रोख १ लाख रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कचरावेचक कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता रसाळ यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंध असूनही विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे माधव गोरे यांचीही कार्यगौरवसाठी निवड झाली. रोख ७५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. क्रीडाक्षेत्रातील कार्याबद्दल जागृती चंदनकेरे, स्पर्धा परीक्षेत चमकणाऱ्या कौस्तुभ दिवेगावकर यांना युवागौरवने सन्मानित केले जाणार आहे. रोख ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अॅड. मनोहर गोमारे, डॉ. ज्योत्स्ना कुकडे, विजय राठी, प्राचार्य नागोराव कुंभार, अतुल देऊळगावकर यांच्या सल्लागार समितीने पुरस्कारार्थी व्यक्तींची निवड केली. उद्या सायंकाळी साडेसहा वाजता माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा