पेंच क्षेत्रातील नवी भूमिगत खाण जमुनियाचे भूमिपूजन व शिलान्यास केंद्रीय कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शहर विकास मंत्री कमलनाथ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग होते.
परासियाचे आमदार सोहनलाल वाल्मिकी, तांत्रिक संचालक ओमप्रकाश, कार्मिक संचालक रूपक दयाल, प्रकल्प संचालक एस. एस. मलही, क्षेत्रीय महाव्यवस्थापक आय.डी. झिंकयानी, वेकोलिच्या संचालन समितीचे सदस्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या परिसरात दहा लाख टन कोळशाचा साठा असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. एमईसीएलच्या अहवालामुळे नवीन कोळसा खाणींचा मार्ग प्रशस्त झाला आहे. नवीन कोळसा खाण जमुनिया सुरू झाल्यानंतर जमिनीतील लाखो टन कोळसा काढला जाईल. येथील व्यवसाय व प्रगतीबाबत मी आशावादी आहे, असे कमलनाथ यावेळी म्हणाले.
समाजातील शेवटच्या घटकालाही या योजनेचा लाभ मिळावा, या खाणीतून लोकांना रोजगाराची संधी मिळावी आणि या भागाचा विकास व्हावा, असे कोळसा मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल म्हणाले. वेकोलिचे अध्यक्ष दिनेशचंद्र गर्ग यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी वेकोलिच्या प्रगतीचा आढावा घेतला. तांत्रिक संचालक ओमप्रकाश यांनी कमलनाथ व जयस्वाल यांचे जमुनिया हेलिपॅडवर स्वागत केले. यावेळी गोंडी नृत्यही सादर करण्यात आले. आमदार
सोहन वाल्मिकी यांनीही विचार व्यक्त केले.

Story img Loader