निर्यातक्षम मूल्यवर्धित पदार्थाच्या निर्मितीपासून बाजारपेठेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने अन्नतंत्र महाविद्यालयातील सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्प हा विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीस लावणारा आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री फौजिया खान यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयातील सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्प निश्चितच प्रशंसनीय असून, असा प्रकल्प राबविणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ आहे. राज्यातील तसेच देशातील विद्यापीठांपुढे हा प्रकल्प अनुकरणीय ठरेल, असे प्रतिपादन फौजिया खान यांनी केले. उत्पादित होणाऱ्या प्रक्रिया पदार्थाच्या विक्रीसाठी विद्यापीठात विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन खान यांच्या हस्ते झाले. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमात खान म्हणाल्या, विद्यापीठाच्या या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेच्या गुणांचा निश्चितच विकास होणार असून भविष्यात या प्रकल्पामुळे औद्योगिकता वाढीस लागेल. करार शेतीच्या माध्यमातून कच्च्या मालाच्या निर्मितीची संधी शेतकऱ्यांना प्राप्त होईल. या भागातील बचतगटातील महिलांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. गोरे म्हणाले, की अनुभवावर आधारित शिक्षण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना प्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी कच्च्या मालाच्या खरेदीपासून ते प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग अशा विविध टप्प्यांवर व्यवस्थापनकौशल्य प्राप्त होणार आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शेतकरी व उद्योजक यांनादेखील फायदा होणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयांत चार वर्षांचा बी.टेक. पदवी अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात अनुभवावर आधारित शिक्षण कार्यक्रमाचा अंतर्भाव आहे. विद्यापीठाने नुकतेच या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व उद्योजक मोहम्मद गौस यांच्या झैन नॅचरल अॅग्रो इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीशी सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर यशस्वीपणे राबवून चांगले पाऊल उचलले आहे. या विक्री केंद्रावर उत्पादित होणारे टोमॅटो सॉस, मिक्स्ड फ्रुट जॅम, आंबा, िलबू, मिरचीचे लोणचे आदी पदार्थ सवलतीच्या दराने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. गेल्या दीड महिन्यापासून या प्रक्रिया युनिटमध्ये अन्नतंत्र महाविद्यालयांचे ५३ विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून, त्यांच्या सहभागाने उत्पादित होणाऱ्या मालावरील नफ्यापकी ५० टक्के वाटा विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. याप्रसंगी राज्यमंत्री खान यांच्या हस्ते या युनिटमध्ये तयार करण्यात आलेला २२ टन मिक्स फ्रुट जॅमच्या मालवाहू वाहनास हिरवा झेंडा दाखवून हा जॅम दुबईस रवाना करण्यात आला. या वेळी या प्रकल्पाचे प्रभारी डॉ. वसंत पवार, उद्योजक मोहम्मद गौस, डॉ. संजय टाकळकर, प्रा. सय्यद हश्मी, पुरुषोत्तम खिस्ते, डॉ. के. एस. गाडे, प्रा. आर. बी. क्षीरसागर, प्रा. बी. एस. आगरकर, प्रा. जी. एम. माजेवाड, प्रा. प्रवीण घाटगे तसेच प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थी उपस्थित होते.
अन्नतंत्र महाविद्यालयाच्या प्रक्रिया पदार्थाच्या विक्री केंद्राचे उद्घाटन
निर्यातक्षम मूल्यवर्धित पदार्थाच्या निर्मितीपासून बाजारपेठेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने अन्नतंत्र महाविद्यालयातील सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्प हा विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीस लावणारा आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री फौजिया खान यांनी केले.
First published on: 16-07-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration to food technique college of sale centre of process substance