माहेराहून पसे आणले नाही, या कारणास्तव नवऱ्याने बायकोच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवे मारण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना जिल्ह्य़ात शनिवारी घडल्या. एक घटना घाटंजी तालुक्यातील साखरा येथे, तर दुसरी उमरखेड तालुक्यातील दिगडी येथे घडली.
घाटंजी तालुक्यातील प्रमिला सखाराम राठोड हिला तिचा नवरा सखाराम तिच्या बहिणीकडून वीस हजार रुपये आणण्याचा तगादा लावत होता. पसे आणण्यास प्रमिलाने नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या सखाराम राठोडने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत प्रमिलाचा मृत्यू झाला. घाटंजी पोलिसांनी तिच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना अधिक धक्कादायक आहे. उमरखेड तालुक्यातील दिगडी येथे राहणाऱ्या राजू दवणे याचा विवाह इंदू नावाच्या तरुणीशी सामूहिक विवाह सोहळ्यात झाला होता. मेळाव्यात लग्न झाल्याने शासनाच्या योजनेअंतर्गत   समाजकल्याण विभागाकडून विवाहित जोडप्याला दहा हजार रुपये मदत दिली जाते. ही रक्कम इंदूच्या आईजवळ होती. ती इंदूने माहेराहून आणावी यासाठी राजू दवणेचा तगादा होता.
इंदूने नकार दिल्याने राजूने इंदूला मारहाण करून रॉकेल ओतून पेटवून दिले. याही घटनेत इंदूचा गंभीररित्या जळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. इंदूच्या मृत्यूपूर्व जबानी आणि शवविच्छेदन अहवालावरून इंदूचा पती, दीर, सासू, सासरा या सर्वांविरुध्द उमरखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.