केंद्राच्या राजीव गांधी आवास योजनेंतर्गत शहरातील झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना पक्की घरे बांधून देण्यात येणार असल्याचे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी सांगितले.
जालना पालिकेचा या योजनेत समावेश झाल्याने शहरातील झोपडपट्टीवासीयांना सव्वादोनशे ते अडीचशे फुटांचे पक्के सिमेंटचे घर बांधता येईल. यात ७५ टक्के खर्च केंद्राचा, तर १५ टक्के खर्च राज्य सरकार करील. तीन लाखांपर्यंत अर्थसाह्य़ उपलब्ध होईल. संयुक्त कुटुंब असेल, तर दोन मजली घरही बांधता येईल. या संदर्भात प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही पालिका लवकरच पूर्ण करणार आहे. शहरातील ३२ झोपडपट्टय़ांत ३५ टक्के लोकसंख्या असल्याने ही योजना त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला. त्यातून काही रस्त्यांची कामे सुरू झाली. आणखी काही रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून १० कोटींचा निधी दिला. शहरातील महात्मा फुले मार्केट, तसेच महावीर मंगल कार्यालयाचे काम बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्त्वावर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. शहरातील बंद पथदिवे सुरू करण्याचा प्रयत्न आहे. पथदिव्यांच्या वीजबिलाची थकबाकी जवळपास १५ कोटी आहे. वीज कंपनीच्या अभय योजनेचा लाभ घेऊन तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ३ कोटी भरून उर्वरित निधीचे हप्ते पाडून घेण्याचा प्रस्ताव असल्याचे आमदार गोरंटय़ाल म्हणाले. काँग्रेसचे जिल्हा चिटणीस राम सावंत या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा