महापालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असूनही मिळकत कराची थकबाकी सातत्याने वाढत असून हा आकडा आता एक हजार कोटींच्या पुढे गेला आहे. या वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्यामुळे वसुलीसाठी र्सवकष प्रयत्न करावेत व प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सजग नागरिक मंचचे विश्वास सहस्रबुद्धे आणि विवेक वेलणकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मागणीचे निवेदनही संघटनेतर्फे आयुक्तांना देण्यात आले आहे. थकबाकीबाबत माहिती देताना सहस्रबुद्धे म्हणाले, की माहिती अधिकारात घेतलेल्या माहितीनुसार थकबाकीची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. एक हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या थकबाकीदारांची माहिती मागवली असता, १ ऑक्टोबर २०१२ अखेर ही थकबाकी ९२५ कोटी रुपये इतकी आहे. तसेच एक हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकीची रक्कम २०० कोटींच्या वर आहे. प्रामाणिक पुणेकरांनी यंदाच्या आर्थिक वर्षांत पहिल्या चार महिन्यात स्वयंस्फूर्तीने ३०० कोटी रुपये इतका मिळकत कर भरला आहे. त्यासाठी महापालिकेने काहीही केलेले नाही. तो पुणेकरांनी भरलेला आहे. याच चार महिन्यांत प्रशासनाने मात्र फक्त १०० कोटींचाच कर गोळा केला आहे. मिळकत कराची थकबाकी एक हजार कोटींवर गेल्यामुळे या वसुलीसाठी र्सवकष प्रयत्न करणे आवश्यक असतानाही वारंवार मागणी करूनही त्याबाबत फक्त मनुष्यबळ कमी असल्यामुळे वसुली होऊ शकत नाही, असे उत्तर मिळत आहे. महाापालिकेची जकात १ एप्रिलपासून रद्द होणार असल्यामुळे त्यातील काही कर्मचाऱ्यांकडे मिळकत कर थकबाकी वसुलीचे काम तातडीने देता येईल. थकबाकीचा आकडा फार मोठा असल्यामुळे ही वसुली प्रभावीपणे झाल्यास पुणेकरांना पुढील पाच वर्षांत कोणत्याही करवाढीला तोंड द्यावे लागणार नाही, असे सजग नागरिक मंचाचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा