* प्रवाशांचे हाल सुरुच
* एटीव्हीएम मशिन्स बंद
* तिकीट खिडक्यांची वानवा
* टान्स हार्बर स्थानकांवर तिकिटांसाठी प्रवाशांच्या रांगा
* कल्याण डोंबिवली स्थानकातही असुविधांच्या तक्रारी
तिकीट खिडक्यांची वानवा, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तिकीट वितरणावर पडणारा ताण, बंद पडलेल्या ऑल टाईम व्हेंडिंग मशिन्सचे (एटीव्हीएम) नेहमीचेच दुखणे, अपुरी कूपन्स आणि नादुरुस्त कूपन व्हेंडिंग मशिन्स..ठाणे, कल्याण-डोंबिवली, वाशी, बेलापूर, नेरुळ, कोपरखैरणे अशा ठाणे, नवी मुंबई पट्टय़ातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर गेल्या काही दिवसांपासून हे चित्र नित्याचे बनले असून यामुळे प्रवाशांचे अतोनात असे हाल सुरू आहेत. वारंवार तक्रारी करूनही यामध्ये फारशी सुधारणा होत नसल्याने गर्दीच्या वेळेत या स्थानकांवर तिकिटासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
प्रवासाकरिता कूपन विक्री योजनेला फाटा देत रेल्वेने मोठय़ा झोकात एटीव्हीएम मशिन्सचा पर्याय पुढे आणला असला तरी सतत नादुरुस्त पडणाऱ्या या यंत्रणेमुळे प्रवाशी अक्षरश हैराण झाले आहेत. वाशी रेल्वे स्थानकात आठ एटीव्हीएम यंत्रे उभारण्यात आली असली तरी त्यापैकी सर्व यंत्रे सध्या बंद आहेत, तर कल्याण स्थानकात २० पैकी अवघी सहा यंत्रे सुरू आहेत. कोपरखैरणे स्थानकात सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत जेमतेम एक तिकीट खिडकी सुरू असते, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे या स्थानकात तिकिटांसाठी भल्यामोठय़ा रांगा लागत असल्याने प्रवाशांचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ट्रान्स हार्बर प्रवासालाही असुविधांचा फेरा
ठाणे-तुर्भे-वाशी हा रेल्वे प्रवासाचा नवा पर्याय रेल्वे आणि सिडकोने सुरू केला असला तरी या स्थानकांवर पायाभूत सुविधांची अक्षरश वानवा असल्याचे चित्र आहे. या मार्गावर वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, ठाणे ही गर्दीची स्थानके मानली जातात. वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली या स्थानकांवर स्थानिक रहिवाशांचा मोठा भार असतो, तर घणसोली आणि रबाळे या स्थानकांवर औद्योगिक पट्टय़ातील कामगारांची गर्दी अधिक असते. त्यामुळे कोपरखैरणे, ऐरोली स्थानकांवर तिकीट खिडक्या वाढविण्यात याव्यात, अशी प्रवाशांची जुनी मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गर्दीच्या वेळेतही जेमतेम एकमेव तिकीट खिडकी सुरू असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. वाशी रेल्वे स्थानकात तिकीट खिडक्यांवर पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नसून सध्या सहा कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या ठिकाणी तिकीट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला एक कर्मचारी क्रीडा कोटय़ातून भरण्यात आल्याने तोही तीन तास काम करतो, अशी माहिती आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत तीनपैकी जेमतेम एक खिडकी सुरू असते.
कल्याण स्थानकात एटीव्हीएम बंद
कल्याण, ठाणे स्थानकात एटीव्हीएम यंत्रणा पुरती कोलमडली असून दोन दिवसांपासून ठाणे स्थानकात एकमेव एटीव्हीएम मशिन सुरू आहे. या ठिकाणी पूर्वेला मशिन्स सुरू असली तरी कूपन पंचिंग यंत्रणाही कोलमडली आहे. कल्याण-डोंबिवली स्थानकात कूपन पंचिंगसाठी पुरेशी यंत्रे नसल्याने मोठय़ा प्रमाणावर बसविण्यात आलेली एटीव्हीएम यंत्रणा येथे फायदेशीर ठरेल, असा कयास बांधण्यात येत होता. प्रत्यक्षात या ठिकाणी एटीव्हीएम मशिन्स वारंवार बंद होतात, अशी तक्रार डोंबिवलीतील रहिवासी प्रथमेश साप्ते यांनी केली. ठाण्यातही हे चित्र नित्याचे असते, असे रुपेश मोरे या प्रवाशाने सांगितले.
’ यासंबंधी कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ठाणे तसेच कल्याण स्थानकात तिकीट विक्रीसंबंधी प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे मान्य केले. ठाणे, कल्याण डोंबिवली, कळवा अशा प्रमुख स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन्स मोठय़ा प्रमाणावर नादुरुस्त असून ही यंत्रणा पूर्णत अपयशी ठरल्याचे परांजपे यांनी सांगितले. ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर िलकवरील रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट खिडक्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर असून या ठिकाणी एटीव्हीएम यंत्रणा कोलमडली आहे, असा दावाही परांजपे यांनी केला.
रेल्वे प्रशासनास ३० कोटी रूपयांहून अधिक महसुल मिळवून देणाऱ्या डोंबिवली स्थानकातील असुविधांविषयी आमदार रविंद्र चव्हाण यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना मंगळवारी एक निवेदन दिले असून त्यात समस्यांचा पाढा वाचण्यात आला आहे. फलाट क्र. ३, ४ आणि ५ ची उंची त्वरीत वाढवून शेड बांधावी, फलाट क्र. ३ व ४ वर स्वच्छतागृह नवीन स्वच्छतागृह बांधणे आदी मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
ठाणे, नवी मुंबईतील रेल्वे प्रवासाला असुविधांचे ग्रहण
* प्रवाशांचे हाल सुरुच * एटीव्हीएम मशिन्स बंद * तिकीट खिडक्यांची वानवा * टान्स हार्बर स्थानकांवर तिकिटांसाठी प्रवाशांच्या रांगा * कल्याण डोंबिवली स्थानकातही असुविधांच्या तक्रारी तिकीट खिडक्यांची वानवा, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तिकीट वितरणावर पडणारा ताण, बंद पडलेल्या ऑल टाईम व्हेंडिंग मशिन्सचे (एटीव्हीएम) नेहमीचेच दुखणे,
First published on: 06-02-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inconvenience of eclipse to thane navi mumbai railway travel