* ‘अनियमित’ वेळापत्रकाचा अनोखा उपक्रम !
प्रवाशांच्या सोयीसाठी उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या वाढविल्याचे सांगत नव्या वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाने वारंवार आपली पाठ थोपटून घेतली असली, तरी प्रवाशांना मात्र या वाढीव फेऱ्यांमुळेच अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत असून ऐन गर्दीच्या वेळी मात्र अनेक गाडय़ांच्या फेऱ्यांमधील वेळाचे अंतर वाढविल्यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती झाली आहे. दक्षिण मुंबईकडे जाण्याच्या गर्दीच्या वेळात या दिशेच्या अपुऱ्या फेऱ्या तर संध्याकाळी परतीसाठी गैरसोयीच्या गाडय़ा यामुळे नव्या वेळापत्रकाचा काडीमात्र फायदा होत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
नोकरदार महिलांसाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर महिला स्पेशल गाडय़ा सुरू करण्यात आल्या. यामध्ये महिला प्रवाशांच्या वेळा आणि त्यांना सोयीच्या वेळा अपेक्षित धरण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र, गैरसोयीच्या वेळांमुळे या गाडय़ा रिकाम्या धावत असून महिलांची परवड होतच आहे. सकाळी बोरिवलीहून सुटणारी महिला विशेष गाडी ही गर्दीची वेळ टळून गेल्यावर सुटते, आणि तिचा बोरिवली-चर्चगेट प्रवास रिकामाच होत असलेला पाहावयास मिळतो. ही गाडी अर्धा तास अगोदर असती, तर नोकरदार महिलांना त्याचा लाभ झाला असता. गाडीची वेळ बदलावी यासाठी अनेकदा महिलांनी निवेदने दिली असली तरी त्या निवेदनावर विचार करण्यासही पश्चिम रेल्वे प्रशासनास वेळ नाही. हार्बर मार्गावरही महिला प्रवासी सकाळच्या वेळी मोठय़ा संख्येने प्रवास करतात. मात्र त्यावेळी महिला विशेष गाडी नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर सायंकाळी वाशी ते ठाणेदरम्यानची महिला विशेष केवळ नावापुरतीच असून या सेवेचा लाभ सर्वच प्रवासी घेतात.
उपनगरी मार्गांवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांची गाडी सुरू करण्यात आली. ही गाडी प्रथम दादर ते विरारदरम्यान चालविण्यात येत होती. प्रवाशांच्या मागणीनंतर ही गाडी चर्चगेटपर्यंत आणण्यात आली. मात्र तिची वेळ दुपारी सव्वाचारची असल्याने ही गाडी जवळपास रिकामीच धावत असते. लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वाहतुकीला अडथळा येतो, त्यामुळे गाडीची वेळ बदलता येत नसल्याचे कारण रेल्वे प्रशासन देत असते. पश्चिम रेल्वेने सुरू केलेल्या १५ डब्यांच्या अन्य गाडीच्या वेळाही अनियमित असल्याने त्याचाही प्रवाशांना त्याचा फारसा फायदा होत नाही आणि गर्दी कमी करण्याचा मूळ हेतूही साध्य होत नाही. मध्य रेल्वेवर रात्री ९.५४ ची १५ डब्यांची गाडी सीएसटीलाच ९.५८ नंतर येते. या गाडीनंतर असलेली ९.५८ ची खोपोली गाडी नेहमीच अगोदर सोडली जाते. या दोन्ही गाडय़ांची वेळ अधिकृतपणे बदलावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
गैरसोयीची वेळापत्रके
उपनगरी रेल्वेने वेळापत्रके जाहीर करण्याचे बंद केले असून आता कधीही उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या वाढविल्याचे अथवा त्या कमी केल्याचे किंवा त्यात आणखी काही बदल केल्याचे सांगण्यात येते. प्रवाशांच्या त्या सोयीच्या आहेत किंवा नाहीत याचा विचार रेल्वेने केलेला नाही. सबर्बन रेल्वे युजर्स कन्स्लटेटिव्ह कमिटीच्या प्रतिनिधींना पूर्वी या वेळापत्रकाबाबत माहिती देण्यात येत असे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या मागण्यांचाही विचार केला जात असे. आता केवळ लोकानुनयासाठी अर्थसंकल्पामध्ये गाडय़ा जाहीर केल्या जातात आणि त्यानुसार त्या कधीही सुरू करण्यात येतात.
उपनगरामध्ये वाढणारी वस्ती लक्षात घेता कर्जत, कसारा, पनवेल आणि विरार येथून थेट गाडय़ांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.
बंद तिकीट खिडक्या आणि जेटीबीएस
उपनगरी रेल्वेच्या कोणत्याही स्थानकाच्या दोन्ही बाजूस तिकीट खिडक्या असणे आणि त्या सुरू असणे आवश्यक आहे. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक तिकीट खिडक्या बंदच असतात. ठाणे येथे नव्या तिकीट खिडक्या सुरू झाल्या, आणि जुन्या खिडक्या बंद आणि नव्या खिडक्यांपैकी निम्या सुरू असे चित्र आहे. परिणामी, प्रवाशांच्या तिकीट खिडक्यांवरील रांगा कायम आहेत.
प्रवाशांच्या रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सीव्हीएम, एटीव्हीएम सुविधा सुरू केल्या, पण देखभालीअभावी अनेक यंत्रे केवळ शोभेची ठरली आहेत. मध्य रेल्वेने तर सीव्हीएम मशीन्स मार्च २०१४ पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, अनेक स्थानकांवर बंद पडलेली सीव्हीएम मशीन्स प्रवाशांना फक्त पाहण्यासाठीच ठेवली आहेत. पश्चिम रेल्वेने सीव्हीएम कुपन्स सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ममता बॅनर्जीनी सुरू केलेली एटीव्हीएम मशीन्सही अनेक ठिकाणी धूळ खात पडली असून दादर, सीएसटी किंवा अत्यंत गर्दीच्या ठिकाणी या मशीन्सवर तिकीट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी मशीन्स गैरसोयीच्या ठिकाणी लपलेली असल्याने शोधावीच लागतात. मध्य रेल्वेवर २५०हून अधिक तर पश्चिम रेल्वेवर २०० एटीव्हीएम मशीन्स सध्या कार्यरत आहेत. प्रत्यक्षात चालू अवस्थेत असलेल्या मशीन्सची संख्या अवघी १५०च्या आसपास (दोन्ही मार्गावर धरून) आहे.
प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे
सुभाष गुप्ता (यात्री संघ मुंबई) :
रेल्वेने वेळापत्रक ठरविण्याचा कालावधी बदलला असून आता गाडय़ांच्या वेळांप्रमाणेच वेळापत्रकही अनियमित प्रसिद्ध होत असते. पूर्वी गाडय़ा वाढण्याचा कालावधी असे आणि त्याचवेळी गाडय़ा वाढविल्या जात होत्या. आता तसे होत नाही. म्हणूनच प्रवाशांना त्याचा त्रास भोगावा लागत आहे.
फलाटांची उंचा वाढविण्यासाठी निधी नाही, तिकीट खिडक्यांवर काम करण्यासाठी कर्मचारी नाही आणि कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी पुरेसा पैसा नाही असे रेल्वे प्रशासनाचे रडगाणे सुरू असते. अनेक निवेदने देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सर्व प्रवासी संघांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याची गरज आहे.
मधू कोटियन (मुंबई रेल प्रवासी संघ) :
वेळापत्रकाची नियमितपणाची प्रथा बंद करून रेल्वेने प्रवाशांना फसवले आहे. वेळापत्रक वेळेवर आले आणि गाडय़ा सुरू केल्या तर त्या प्रवाशांना समजू शकतात. आता कधीही नवी गाडी सुरू होते आणि कधीही एखादी गाडी बंद होते. हे कळत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. यामुळेच प्रत्येक गाडीला गर्दी होऊ लागली आहे.