गेल्या चार वर्षांत मुंबईत वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून ते आता पूर्व मुक्त मार्ग असे प्रकल्प वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून कार्यान्वित झाले. वाहतूक कोंडी फुटावी आणि जलदगतीने प्रवास व्हावा असा या प्रकल्पांमागील हेतू असला तरी बहुतांश ठिकाणी फक्त तो सेतू-रस्ता-उड्डाणपुलावरील प्रवास जलदगतीने होतो आणि तेथून उतरताच लगेच वाहतूक कोंडीचा ‘ब्रेक’ लागतो. परिणामी हजारो कोटी रुपये या प्रकल्पांवर खर्ची पडल्यावरही वाहतूक कोंडी काही सुटत नाही, फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिचे स्थलांतर होते. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल, मुक्त मार्ग, सागरी मार्ग अशा उपायांबरोबरच मुळात खासगी वाहने रस्त्यावर कमीत कमी येतील असे नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी अर्थातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दर्जेदार, वक्तशीर, भरवशाची आणि परवडण्याजोगी असणे गरजेचे आहे. मात्र सध्या तरी सरकारचा सारा भर अधिकाधिक वाहने धावू शकतील असे उपाय करण्यावरच आहे.
मुळात सागरी सेतू, पूर्व मुक्त मार्ग, उड्डाणपुलांमुळे खासगी वाहनचालकांना प्रोत्साहन मिळते. खासगी वाहनांचा विचार करून हे प्रकल्प राबवण्यात येतात व तेथेच सारे गणित चुकते. जास्त वाहने रस्त्यावर येतात व त्यातून दोन टोकांना वाहतूक कोंडी होतेच. शहरातील वाहतूक कोंडी सोडवायची तर बससारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांना प्रोत्साहन मिळेल असे नियोजन हवे.
अशोक दातार, पायाभूत सुविधा तज्ज्ञ
गेल्या काही वर्षांत मुंबईत पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प मार्गी लागले. मात्र त्याच वेळी वाहनांची संख्याही भरमसाठ वाढली आहे. पार्किंगसाठी जागा नसतानाही लोक गाडय़ा विकत घेतात आणि त्या सोसायटीबाहेर रस्त्यांवर उभ्या करतात. वाहनांची संख्या दरवर्षी सुमारे दहा टक्क्यांनी वाढत असताना गेल्या वीस वर्षांत रस्त्यांचे क्षेत्र मात्र फारसे वाढले नाही. या क्षेत्रात संपूर्ण २० वर्षांत मिळून १० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी अटळ आहे. तरीही या नव्या प्रकल्पांमुळे थोडा फायदा नक्कीच झाला आहे.
व्ही. एन. मोरे, परिवहन आयुक्त
वांद्रे-वरळी सागरी सेतू
स्वरूप आणि उद्दिष्ट – पश्चिम उपनगरांतील वाहने जलदगतीने दक्षिण मुंबईत यावीत यासाठी पश्चिम मुक्तमार्ग प्रकल्पांतर्गत सागरी सेतूंची साखळी करायचे ठरले. त्यानुसार वांद्रे ते वरळी दरम्यान सागरी सेतू बांधण्यात आला. या सेतूची लांबी ४.७ किलोमीटर असून त्यासाठी १६३४ कोटी रुपयांचा खर्च झाला. एरवी गर्दीच्या वेळी वांद्रे-वरळी प्रवासाला सुमारे एक ते सव्वा तास लागायचा आणि २३ सिग्नलवर थांबावे लागायचे. या आठ पदरी सागरी सेतूमुळे या प्रवासाला आता निम्माच वेळ लागतो आणि जवळपास ३० मिनिटे वाचतात, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. या पुलावरून रोज सुमारे ४० हजार वाहने प्रवास करतात.
सद्यस्थिती – या सागरी सेतूमुळे वांद्रे-वरळी या प्रवासाला कमी वेळ लागत असला, तरी सेतू मुख्य रस्त्यांना मिळतो तेथे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी ठरलेली असते. वरळीहून या सेतूने वांद्रय़ाजवळ पोहोचल्यानंतर अलियावर जंग इन्स्टिटय़ूटजवळील पुलावर गाडय़ांच्या रांगा लागतात. पश्चिम द्रुतगती मार्गावर पसरलेली लांबच लांब रांग धडकी भरवते. तीच गत वरळीच्या बाजूला बाहेर पडणाऱ्या वाहनांची! हॉटेल ब्लू सीच्या जवळ बाहेर पडणारी ही वाहने ‘सास्मीरा’च्या दिशेने पुढे ‘रांगू’ लागतात. त्याचप्रमाणे अॅट्रीया मॉलकडून सागरी सेतूकडे येणाऱ्या रस्त्यावरही वाहतूक कोंडी ही समस्या बनली आहे.
लालबाग उड्डाणपूल
शीव ते छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत डॉ. आंबेडकर रस्त्याने प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचावा आणि भारतमाता चित्रपटगृह, लालबाग परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी २.४५ किलोमीटर लांबीचा चार पदरी उड्डाणपूल बांधण्यात आला. त्यासाठी १४० कोटी रुपये खर्च आला. या उड्डाणपुलामुळे सात सिग्नल टळले. हा उड्डाणपूल परळच्या आयटीसी हॉटेलजवळ सुरू होतो आणि थेट भायखळय़ाच्या प्राणिसंग्रहालयाजवळ संपतो.
सद्यस्थिती – मुंबईकडे येणारी वाहने सात सिग्नल टाळून भायखाळ्याच्या जिजामाता उद्यानाजवळ उतरताना त्यांच्या चाकांना खिळ बसते. या पुलाखालून जिजामाता उद्यानाजवळ येणारा रस्ता अतिशय अरुंद आहे. या रस्त्यावरून बेस्ट बस, मोठय़ा गाडय़ा यांची वाहतूक होत असते. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाजवळ ‘बॉटल नेक’ बनतो.
त्यातच पुढे भायखळा स्थानकाबाहेरचा उड्डाणपूल, त्याखालील गर्दी आदी गोष्टींमुळे वेगाला खिळ बसते. ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहने लालबाग ओलांडून सिमेंट चाळीजवळ उतरतात आणि पुलाखालून येणाऱ्या गाडय़ा त्यांची वाट अडवतात. सुदैवाने येथे रस्ता बऱ्यापैकी रुंद असल्याने वाहतूक कोंडी क्वचितच होते.
बर्फीवाला उड्डाणपूल (अंधेरी)
अंधेरीतील एस. व्ही. रोड सिग्नलवर होणारी वाहतुकीची तुफान कोंडी सोडवण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम दळणवळण सुरळीत होण्यासाठी बर्फीवाला उड्डाणपूल बांधण्यात आला. या उड्डाणपुलाची लांबी ५७४ मीटर आहे. या पुलासाठी ४२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. जून २०११ मध्ये प्रथम या उड्डाणपुलाची दक्षिणेकडील १९० मीटर लांबीची बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. नंतर जानेवारी २०१२ मध्ये उत्तरेकडील ३८४ मीटर लांबीची बाजू खुली करण्यात आली. या उड्डाणपुलामुळे गोखले पुलावरून जुहू गल्लीकडे जाणे आणि येणे सोपे झाले. तसेच एस. व्ही. रस्त्यावरील सिग्नल टळल्याने वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका झाली. रोज जवळपास ७० हजार वाहने या उड्डाणपुलावरून जातात.
सद्यस्थिती – ठाणे, घाटकोपर, विक्रोळीवरून अंधेरीला येण्यासाठी निघालेली वाहने पूर्वीच्या गोल्ड स्पॉट कंपनीवरून बर्फीवाला उड्डाणपुलाजवळ येताना आधीच वाहतूक कोंडीत सापडतात. मात्र एकदा हा उड्डाणपूल लागला की, वाहनांना थोडा वेग घेण्याची मुभा मिळते. हा उड्डाणपुल जुहूच्या दिशेने उतरताना पुलाखालून येणारा रस्ता काहीसा अरुंद आहे. त्यामुळे येथे थोडी समस्या उद्भवते. पण या पुलामुळे स्वामी विवेकानंद मार्गावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात नक्कीच कमी झाली आहे. अंधेरी पूर्वेकडे उतरताना या पुलावरील वाहनांना पुलाखालून येणाऱ्या वाहनांचे भान बाळगावे लागते. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडी कायम असतेच.