जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समितींचे सभापती यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ करण्याची घोषणा ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केली. लवकरच हा आदेश जारी करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.
नगर तालुका पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आज पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री बबनराव पाचपुते होते. तत्पूर्वी शेवगाव येथील पंचायत समितीच्याही नूतन इमारतीचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदांच्या शाळा ताकदीने पुढे नेण्यासाठी जि. प. शाळांचा दर्जा तपासून त्यांना मानांकन दिले जाणार असल्याचा व त्यासाठी ५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख असल्याचा पुनरुच्चार करुन पाटील यांनी सांगितले की, ग्रामविकास खात्यातील रिक्त पदे भरण्यासाठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. येत्या पाच महिन्यात सर्व गट विकास अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जातील. पंचायत समित्यांच्या सभापतींनाही लवकरच स्वतंत्र वाहने मिळतील.
जि. प. आणि पं. स.चे मतदारसंघ सारखे न बदलता किमान १५ वर्षांंसाठी आरक्षण ठेवण्यास पाटील यांनी त्यास यावेळी बोलताना नकार दिला.
पालकमंत्री पाचपुते म्हणाले, जिल्ह्य़ाचा यंदाचा वार्षिक अराखडय़ाचा प्रस्ताव ३९३ कोटी रुपयांचा आहे, त्यात ७० कोटी रुपये पर्यटन विकासासाठी व ७५ कोटी रुपये अदिवासी विकासासाठी आहेत. नगर तालुक्याला पुढे नेण्यासाठी १२ हजार एकरवर एमआयडीसीची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी कोणतीही बागायती जमीन घेतली जाणार नाही, किंमत ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने जमीन मालकांना चांगली किंमत देण्याचा प्रयत्न करु, त्यातुन किमान ६ लाख जणांना रोजगार मिळेल.
जि. प. अध्यक्ष विट्ठलराव लंघे यांनी जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थितीत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेस मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना जि. प. संदर्भातील विविध प्रश्नांकडे त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार, माजी सभापती सुर्यभान पोटे यांची भाषणे झाली. जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. सभापती कैलास वाकचौरे, शाहुराव घुटे, सीईओ रवींद्र पाटील तसेच जि.प. सदस्य व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप-शिवसेनेचा बहिष्कार,
महापौर मात्र व्यासपीठावर
फर्निचर व वीजेची व्यवस्था झाली नसताना या नुतन इमारतीचे उद्घाटन होत असल्याचा आक्षेप घेत पं. स.मधील सत्ताधारी सेना-भाजप व काँग्रेसच्या पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले होते. मात्र सेनेच्या महापौर शिला शिंदे, नगरसेवक दिलीप सातपुते पूर्णवेळ व्यासपीठावर उपस्थित होते. बहिष्काराबद्दल दोन्ही मंत्र्यांनी व जिल्हाध्यक्ष शेलार यांनी जोरदार टीका केली. फर्निचरसाठी ७२ लाख त्वरित मंजुर करण्याचे व १५ दिवसांत वीजेची व्यवस्था करण्याचे अश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. पाचपुते म्हणाले-नगर तालुक्यात दुसऱ्याचा तंबाखू व चुना घेऊन पालकमंत्र्यांवर पिचकाऱ्या मारण्याचा उद्योग काही जण करत आहेत. नगर तालुक्याला तीन आमदार व एक पालकमंत्री आहे, विभाजनाने काही बिघडले नाही, केवळ काही जणांच्या अहंगडाने अडचणी वाढल्या आहेत. ज्यांच्याकडे मागण्या करायच्या त्यांच्यावर बहिष्कार टाकला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा