पुढील आठवडय़ात भाजपचे धरणे आंदोलन
ठाणे शहरात काही महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेल्या नवीन मीटरमुळे नागरिकांच्या वीज बिलात प्रचंड वाढ झाली असून यासंबंधी नागरिकांनी तक्रारी करूनही त्याची महावितरणकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार संजय केळकर यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला. तसेच यासंदर्भात, पुढील आठवडय़ात बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहरातील काही भागांमध्ये महावितरणमार्फत नवीन वीज मीटर बसविण्यात आले असून या नागरिकांच्या वीज बिलात प्रचंड वाढ झाली आहे. दुप्पट/तिप्पट आणि त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात बिले आल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात, नागरिकांनी महावितरणचे ठाणे विभागाचे अधीक्षक अभियंता हुमणे यांना भेटून त्यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र, अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या उलट नागरिकांना अशा स्वरूपाची बिले येण्याचा प्रकार सुरूच आहे, असेही केळकर यांनी सांगितले. नव्याने बसविण्यात आलेल्या मीटरमध्ये मोठय़ाप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जुने मीटर काढताना लोकांना विश्वासात घेण्यात आलेले नसून त्याचे शेवटचे रिडिंगही त्यांना देण्यात आलेले नाही. तसेच नवे मीटर बसविताना त्याचे रिडिंगही दाखविण्यात आले नाही. त्यामुळे महावितरणकडून नागरिकांना अंदाजे बिले पाठविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. बिले कमी करण्यासाठी नागरिक विद्युत कार्यालयात जातात, तेव्हा तेथील अधिकारी त्यांच्याशी उद्धटपणे वागतात, त्यांना आधी बिले भरावेच लागेल अन्यथा वीज कापली जाईल, अशा धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा