लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतो. आयुष्यातल्या या गोड वळणावर नव्या नात्याची गुंफण करण्यासाठी मुलीसह तिचे नातेवाईक उत्सुक असतात. लग्नाची तारीख ठरते, खरेदी होते, सर्व तयारी होते आणि पत्रिकाही वाटल्या जातात.. पण ऐनवळी म्हणजे चक्क आदल्या दिवशी मुलाने लग्नास नकार दिला तर.. अर्थात मुलीवर आणि तिच्या कुटुंबीयांवर अक्षरश: आभाळ कोसळतं. ती केवळ फसवणूक नसते तर या प्रकरणानंतर मानसिकदृष्टय़ाही मुलगी आणि तिचे कुटुंबीय उद्धवस्त होतात. मुंबईत तीन तरुणींच्या बाबतीत नुकतीच ही शोकांतिका घडली.

एका इमेलने उद्धवस्त केले   
पहिली फसवणुक झाली ती शालिनी अडवाणी (२८) (नाव बदलेले) या तरुणीची. ती मुंबईतल्या एका नामांकित महाविद्यालयात शिकत होती. २००४ मध्ये तिची ओळख सुयोग अष्टेकर (३१) या तरुणासोबत झाली. तो एका बॅंकेतील मॅनेजरचा मुलगा होता. मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. तब्बल सात वर्षे त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. लग्नाच्या आणाभाका घेतल्या गेल्या. सुयोग इस्टेट एजंटचे काम करायचा. पदवी शिक्षणानंतर शालिनी उच्च शिक्षण घेत होती. दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. सुयोग मराठी तर शालिनी सिंधी. माझे कुटुंबीय या लग्नास तयार नसले तरी मी घरच्यांचा विरोध पत्करून लग्नास तयार आहे, असे त्याने तिला सांगितले. १ मे २०१४ ही लग्नाची तारिख ठरली. शालिनीच्या कुटुंबियांनी लग्नाची तयारी सुरू केली. हॉल बुक झाला. खरेदी सुरू झाली. पत्रिका वाटल्या गेल्या. सात वर्षांचे गोड प्रेमसंबंध आयुष्यभराच्या नात्यात रुपांतरीत होणार असल्याने शालिनीच्या आनंदाला पारावार नव्हता. सगळं आनंदाने सुरू होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी शालिनीला एक इमेल आला. तो ईमेल वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकली.. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझं यापूर्वीच लग्न झालेलं आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय मी लग्न करू शकत नाही.. सुयोगचे २००९ मध्ये लग्न झाले होते. पण त्याने ही बाब लपवून ठेवली होती. सात वर्षांच्या काळात त्याने शालिनीला जराही कल्पना येऊ दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कुर्ला पोलीस ठाण्यात धाव घेतली. आम्ही सुयोगला फसवणुकीच्या गुन्ह्य़ाखाली अटक केली अशी माहिती कुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव जगदाळे यांनी दिली. सुयोगने पद्धतशीर शालिनीची फसवणूक केली होती. २००९ मध्ये त्याने लग्न केले. तो सुद्धा प्रेमविवाह होता. पहिल्या पत्नीलाही त्याने अंधारात ठेवले होते. सुयोग असं का वागला या प्रश्नाचं उत्तर मात्र शालिनीला अद्याप मिळालेलं नाही..

 दोन दिवस आधी मुलगा गायब..
पुण्यात राहणाऱ्या वैशाली (नाव बदललेले) या तरुणीचे सायन मध्ये राहणाऱ्या विशाल गायकवाड (२६) या तरुणाशी लग्न ठरले होते. ११ जानेवारी २०१३ रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर नियमित विशाल वैशालीला भेटण्यासाठी बोलावत असे. २६ मे २०१३ रोजी त्यांचे लग्न होणार होते. या लग्नाचीही सगळी तयारी झाली होती. पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या. पण लग्नाच्या दोन दिवस आधी विशाल गायब झाला. विशाल घर सोडून गेला. पण तो कुठे गेला त्याची आम्हाला काहीच माहिती नाही असे सांगत त्याच्या कुटुंबियांनी हतबलता व्यक्त केली. वैशालाही पुरती कोसळली होती. विशालचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न झाला. पण तो कुठे सापडला नाही. सहा महिन्यानंतर विशाल बाबत वैशालीच्या कुटुंबियांना माहिती मिळाली. त्यांनी मग अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. साखरपुडा झाल्यानंतर विशालने वैशालीशी शरीरसंबंध ठेवले होते. त्यामुळे त्याच्यावर फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आणि तो गजाआड गेला. माझे अन्य एका मुलीशी प्रेमसंबंध होते तिला कसा धोका देऊ म्हणून मी पळून गेलो असे निर्लज्जपणे विशालने पोलिसांना सांगितले.

लग्नाच्याच दिवशी..
२४ एप्रिल २०१४  रोजी मुंबईत मतदानाची धामधूम होती. त्यावळी मुंबई उपनगरात एका लग्नाच्या तयारीसाठी हॉल सजत होता. सीमाचे (नाव बदललेले) नातेवाईक मुंबईत आले होते. आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रमही झाला. आयुष्यातल्या सर्वात मोठय़ा सोहळ्यासाठी सीमा तयार होत होती. पण त्याच रात्री तिचा भावी वर घर सोडून गेला होता. ही बातमी ऐकून एकच हाहाकार उडाला. लांबून आलेले पाहुणे परत गेले. घरावरची रोषणाई बंद करण्यात आली. सीमाच्या कुटुंबियांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण मुलाच्या कुटुंबियांनी आतापर्यंत झालेला सगळा खर्च देऊन तक्रार करू नका अशी विनंती केली. त्यामुळे त्यांनी बदनामी होईल यामुळे तक्रार दाखल केली नाही. तक्रार केली असती तर आम्ही मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना फसवणुकीच्या गुन्ह्य़ाखाली अटक केली असती असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासीर पठाण यांनी सांगितले.

Story img Loader