आपल्याकडचा बाबा आदमच्या काळातील सेलफोन बदलून नवा कोरा चकचकीत, बोटांच्या तालावर नाचणारा स्मार्टफोन घेण्यासाठी दहावी-बारावीचा निकाल हा विद्यार्थ्यांसाठीच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणायला हवा. यंदा राज्य शिक्षण मंडळाच्याच नव्हे तर सीबीएसई, आयसीएसई अशा इतर मंडळांच्या बारावी आणि दहावीच्या निकालांनीही मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही जाम खूश करून टाकले आहे. गुणपत्रिकेवर ८०-९०च्या घरात टक्के असतील तर मुलांना त्यांच्या आवडीचा फोन नव्हे, स्मार्टफोन मिळण्याचा मार्ग सहज होतो. म्हणून निकाल जाहीर झाल्यानंतर पेढय़ांच्या दुकानांखालोखाल गॅझेटची दुकाने गर्दीने फुलू लागली आहेत.
एकेकाळी महत्त्वाच्या परीक्षांचे खास करून दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला की महाविद्यालयात जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे लागणार म्हणून दुकानांमधून खास गर्दी केली जात असे. याशिवाय घडय़ाळ, नवीन शूज, पर्स अशी काहीबाही आश्वासने निकालानंतर पूर्ण केली जात. चांगले मार्क पडले तर आई-बाबाही मनमोकळेपणाने खर्च करतात. परंतु, आता कपडे, घडय़ाळ, शूज, पर्स या सगळ्यांची जागा सेलफोन, स्मार्टफोनने घेतली आहे. अभ्यासाकरिताही किंवा मुलांच्या सुरक्षेच्या विचाराने पालकही निकालानंतर बक्षीस म्हणून सेलफोन हा सोयीचा पर्याय मानू लागले आहेत.
उच्च शिक्षणासाठीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या या मुलांमध्ये गॅझेटविषयी आकर्षण असते. त्यातही गेमिंगसाठी उत्कृष्ट असलेल्या सेलफोनना मुलांची पसंती असते. ‘अर्थात निकाल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात जाहीर झाल्याने सेलफोनची खरेदी म्हणावी तशी सुरू झालेली नाही. परंतु, किशोरवयीन मुलांकडून बाजारात कुठले नवीन सेलफोन आले आहेत या चौकशीसाठीची गर्दी वाढली आहे,’ असे अंधेरी येथील ‘दि टेन’चे मॅनेजर हितेश निसार यांनी सांगितले.
निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा दुकानातला ‘वॉक-इन’ वाढतो. कुठल्या फोनवर ‘स्कीम’ आहेत, गेमिंगसाठी कुठला फोन चांगला यासाठीच्या विचारणा करण्यासाठी मुले मोठय़ा संख्येने येत असल्याने आम्हाला सोमवारी सुट्टीच्या दिवशीही दुकान चालू ठेवावे लागते, असे बोरीवलीतील ‘टॉप टेन’चे तेजस सत्रा यांनी सांगितले. निकाल जाहीर झाल्यानंतर विक्रीमध्ये साधारणपणे १० ते २० टक्के वाढ दिसून येते. एरवी आम्ही महिन्याला ७०० युनिट्स विकत असू तर या काळात हा आकडा ८०० ते ८४० पर्यंत जातो, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा