शहर परिसरात खासगी शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराचा प्रत्यय शिक्षण विभागाने घेतला. शुल्कवाढ आणि त्यामुळे होणारी आंदोलने, निदर्शने लक्षात घेता शिक्षण मंडळाने पालिका हद्दीतील शाळांकडे शुल्कवाढीसंदर्भातील प्रस्ताव मागविले असून आतापर्यंत त्यास केवळ २० शाळांचा प्रतिसाद लाभला आहे. हे प्रस्ताव शिक्षण उपायुक्तांकडे सादर केले गेले असून या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. दाखल प्रस्तावांवर नजर टाकल्यास शुल्कवाढ करण्यास उत्सुक असणाऱ्यांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या लक्षणीय आहे. एकंदर यंदाचे शैक्षणिक वर्षही पालकांसाठी शुल्कवाढीचा बोजा टाकणारे ठरणार असल्याचे दिसत आहे.
मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस शिक्षण शुल्क कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार शुल्कवाढ करताना पालक समितीसमोर हा प्रस्ताव मांडत त्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या बैठकीत शुल्कवाढीवर चर्चा अपेक्षित आहे. मात्र बहुतांश शाळांमध्ये शुल्कवाढीसंदर्भात शिक्षकांची संमती गृहीत धरून पुढील प्रक्रिया पार पाडली जाते. मागील वर्षी शहरात सेंट फ्रान्सिस हायस्कूलने केलेली शुल्कवाढ पालकांसह पोलीस, शालेय व्यवस्थापन या सर्वाची डोकेदुखी ठरली. हा विषय न्यायालयापर्यंत गेला. या प्रकरणावरून धडा घेत शिक्षण मंडळाने खासगी शिक्षण संस्थांच्या शुल्कवाढीला कुठे तरी लगाम बसावा यासाठी या संदर्भातील प्रस्ताव सादर करणे बंधनकारक केले आहे.
शहरातील शाळांची भरमसाट संख्या लक्षात घेता असे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांची संख्या मात्र अल्प असल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांचा विचार केला असता २०१३-१४ मध्ये सीबीएसईसाठी होरायझन अॅकॅडमी, अशोका युनिव्हर्सल, होली मदर इंग्लिश मीडियम स्कूल, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलने प्रस्ताव सादर केला. २०१४-१५ वर्षांसाठी होरायझन अॅकॅडमी (राज्य मंडळ), दादासाहेब देवधर इंग्लिश मीडियम, फ्लाइंग कलर्स इंग्लिश मीडियम, के. एन. केला इंग्लिश मीडियम, जेम्स इंग्लिश मीडियम, होरायझन अॅकॅडमी (सीबीएसई), नवरचना इंग्लिश मीडियम, स्व. मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यामंदिर चुंचाळे या शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. २०१५-१६ मध्ये होरायझन (आयसीएसई), सेंट सादिक वडाळा, जेम्स इंग्लिश मीडियम, क्युबेल इंग्लिश मीडियम, साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम, ग्लोबल व्हिजन, सेंट थॉमस इंग्लिश मीडियम, सरस्वती इंग्लिश मीडियम कामटवाडा, प्रोग्रेसिव्ह, रायझिंग स्टार, विजय प्रायमरी, सेंट लॉरेन्स इंग्लिश मीडियम, आदर्श प्रायमरी इंग्लिश मीडियम, अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद व गांधीनगर, म्हसरूळ, इंदिरानगर, बालशिक्षण मंदिर श्रमिकनगर, सरस्वती विद्यालय कामटवाडा, धनलक्ष्मी विद्यामंदिर प्राथमिक शाळा यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. हे प्रस्ताव शुल्कवाढीचे निकष, नियमानुसार शिक्षण उपसंचालकांकडे छाननीसाठी सादर करण्यात आले आहेत.२० शाळांकडून प्रस्ताव
खर्चाचा तपशील देण्यास टाळाटाळ
शिक्षण शुल्क कायद्यानुसार डिसेंबर अखेरीस पुढील शैक्षणिक वर्षांत शुल्कवाढ करायची असेल तर त्या संदर्भातील प्रस्ताव कार्यकारिणी समितीसमोर ठेवावा लागतो. प्रस्तावात वर्षभरात विद्यार्थ्यांवर केलेला खर्चाचा तपशील सादर करणे, खर्च आणि विद्यार्थीसंख्या यांचा विचार करून प्रत्येक विद्यार्थ्यांवर होणारा खर्च पाहता शैक्षणिक शुल्क निश्चित करावे लागले. मात्र शाळेकडून प्रस्ताव सादर करताना खर्चाचा तपशील दिला
जात नाही.
– छाया देव
(उपाध्यक्ष, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच)
शाळांकडून प्रस्ताव
पाठविण्यास सुरुवात
शुल्कवाढीवरून पालक आणि शालेय व्यवस्थापन यातील संघर्ष पाहून शहरातील
काही खासगी संस्थांनी शुल्कवाढीचे प्रस्ताव पाठविण्यास सुरुवात केली. आजवर शिक्षण संस्थांकडून परस्पर शुल्कवाढ करण्यात
येत होती.
– वसुधा कुरणावळ
(प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका)