कर्मभूमी एक्स्प्रेस, कुशीनगर- कुर्ला एक्स्प्रेस या मुंबईकडे जाणाऱ्या अतिजलद गाडय़ांमध्ये मनमाड परिसरात लुटमारीचे प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर सर्व गाडय़ांमध्ये रात्रीचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
धावत्या रेल्वे गाडय़ांमध्ये मनमाड ते नाशिक रोडदरम्यान मध्यरात्री प्रवासी झोपेत असताना हत्याराने त्यांना मारहाण करून लूट करण्याच्या घटना लागोपाठ दोन दिवस घडल्या. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. शनिवारी मध्यरात्री गोरखपूर-कुशीनगर- कुर्ला एक्स्प्रेसमध्ये लासलगावनजीक प्रवाशांवर चाकूचे वार करीत लूटमार करण्यात आली होती. त्यात एक प्रवासी जखमी झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे मुंबईकडे जाणाऱ्या दरभंगा–कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये मनमाडहून गाडी सुटताच सर्वसाधारण डब्यातील प्रवाशांना मारहाण करून त्यांची लूट करण्यात आली होती. तोंडाला रुमाल बांधून डब्यात बसलेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवित धमकाविणे सुरू असताना काही प्रवाशांनी प्रतिकाराचा प्रयत्न केल्यावर चोरटय़ांनी चार जणांना जखमी केले. प्रवाशांकडील रोकड व ऐवज घेऊन साखळी ओढून गाडी थांबताच त्यांनी पलायन केले.
अंधेरी येथील सुधीर मंडल या प्रवाशाने मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. शुक्रवारी कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये ही असाच प्रकार झाला होता. पोलिसांनी श्वानपथकाव्दारे चोरटय़ांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलेले नाही. लुटमारीच्या या घटनांनंतर रात्रीच्या वेळी मुंबईकडे जा-ये करणाऱ्या सर्व प्रवासी गाडय़ांमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा