प्रतिचौरस फूट १५ हजार रुपये
‘म्हाडा’च्या १२५९ घरांच्या सोडतीमुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना एक आशा निर्माण झाली असली तरी घरांच्या दरांचा आलेखही चढता असल्याने ‘म्हाडा’ची घरे आता पूर्वीसारखी स्वस्त राहिली नाहीत असे चित्र आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या घराचा दर सुमारे साडेचार हजार रुपये प्रति चौरस फूट असून उच्च उत्पन्न गटातील घराचा दर तर तब्बल चौरस फुटाला १५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे घरांच्या किमतीवरून स्पष्ट होत आहे. खासगी बिल्डरांच्या तुलनेत दर थोडा कमी बसत असला तरी तो ‘रास्त मर्यादे’च्या बराच पलिकडे गेला आहे.
मुंबईतील जागांच्या किमती आणि जागेच्या टंचाईचा लाभ उठवत घरांच्या किमती बिल्डरांनी गगनाला भिडवल्या. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर मिळण्यासाठी सर्वसामान्य माणसापुढे केवळ ‘म्हाडा’चा पर्याय राहिला आहे. परिणामी दरवर्षी ‘म्हाडा’च्या सोडतीकडे लोकांचे लक्ष लागलेले असते. गेल्या दोन-तीन वर्षांत ‘म्हाडा’ने घरांच्या किमती चांगल्याच वाढवण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. गेल्या दीड वर्षांत तर आधीच्या सोडतींसाठी जाहीर केलेले घरांचे दर दीड लाख ते तब्बल १५ लाख या टप्प्यात वाढवण्यात आल्याचा इतिहास आहे.
यंदाच्या सोडतीमधील घरांच्या किमतीही रास्त दराच्या संकल्पनेशी फारकत घेणाऱ्याच आहेत. यंदा अत्यल्प उत्पन्न गटातील घरांचे दर सुमारे ४६७७ रुपये प्रति चौरस फुटांपर्यंत आहेत. तर अल्प उत्पन्न गटातील ३०५ चौरस फुटांच्या घरांच्या किमती प्रति चौरस फूट ७२०० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमती साडे सहा हजार रुपये प्रति चौरस फुटांपासून ७८६६ रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. सर्वाधिक दर अर्थातच उच्च उत्पन्न गटातील घरांसाठी ठेवण्यात आला आहे. गोराईतील उच्च उत्पन्न गटातील घरासाठी सुमारे ८९३२ रुपये प्रति चौरस फूट असा दर लावण्यात आला असून पवईतील घरासाठी चौरस फुटाला १५ हजार ८०२ रुपये मोजावे लागतील.
‘म्हाडा’च्याही घरांचे दर भिडले गगनाला!
प्रतिचौरस फूट १५ हजार रुपये ‘म्हाडा’च्या १२५९ घरांच्या सोडतीमुळे मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना एक आशा निर्माण झाली असली तरी घरांच्या दरांचा आलेखही चढता असल्याने ‘म्हाडा’ची घरे आता पूर्वीसारखी स्वस्त राहिली नाहीत असे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-04-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in rate of mhada houses