डिझेल आणि वस्तूंच्या किमती वाढल्याचे कारण समोर करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १ जुलैच्या मध्यरात्री ६.४८ टक्क्यांनी प्रवासी भाडय़ात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना नागपूर-पुणेसाठी ७४ रुपये, नाशिकसाठी ७० तर शिर्डीसाठी ६५ रुपये जादा द्यावे लागणार असून सर्वसामान्यांना या महागाईच्या काळात प्रवासभाडय़ाचा फटका बसणार आहे.
एसटी व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमध्ये कामगार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून एसटी कामगारांना या करारात  पगारवाढ चांगली मिळाली आहे; परंतु एसटी प्रशासनावर याचा आर्थिक भार पडणार आहे. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती कमी होत असल्यामुळे एसटी प्रशासनाने एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रवासभाडय़ात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरहून पुण्यासाठी निमआराम बसचे भाडे नवीन दरवाढीनुसार ९६७ रुपये एवढे झाले आहे जे की ८९३ होते.
नवीन दरवाढीनुसार नागपूर-पंढरपूरचे निमआरामचे ८९३ वरून ९६७ रुपये झाले आहे. नागपूर-औरंगाबाद जलद व साधारण भाडे आता ४९५ झाले जे ४५९ रुपये होते. नागपूर-शिर्डी निमआराम ८५०च्या ऐवजी ९२० रुपये झाले आहे. नागपूर-अकोला जलद व साधारण भाडे २२७ वरून २४२ रुपये झाले. निमआराम बसचे भाडे ३०२ वरून ३२८ रुपये झाले. नवीन दरवाढीने प्रवाशांच्या आर्थिक स्थितीला चांगलाच फटका बसणार आहे.  नवीन दरवाढ बघितल्यास एकूण  १ ते २४ किमीच्या प्रवासात १ रुपये, २५ ते ३० किमीसाठी २ रुपये, ३० ते ५४ किमीसाठी ३ रुपये, ५४ ते ७८ किमीच्या प्रवासात ४ रुपये, ७८ ते ९० किमीच्या प्रवासाठी ५ रुपये, ९० ते २०२ किमीच्या प्रवासासाठी ६ रुपयांची दरवाढ  झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एवढी प्रवासभाडय़ात दरवाढ केली असली तरी प्रवासी सुविधांचे काय, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.