पश्चिम विदर्भात गेल्या दशकभरात पीक रचनेत प्रचंड बदल झाले असून सोयाबीनचे लागवडीखालील क्षेत्र तब्बल ८ लाख हेक्टरने वाढले तर, कपाशीच्या क्षेत्रात ४ लाख हेक्टरची घट झाली आहे. या उलथापालथीचा प्रभाव ज्वारी, तीळ यासारख्या पिकांवर मोठय़ा प्रमाणावर पडल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या खरीप हंगामातही सोयाबीनने अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे.
कृषी विभागाच्या पीक-पेरणी अहवालानुसार ६ जुलैअखेर अमरावती विभागात ८० टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. विभागात सोयाबीनच्या लागवडीखालील सरासरी क्षेत्र १० लाख ९८ हजार हेक्टर आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे १२ लाख ६३ हजार हेक्टरमध्ये (११५ टक्के) सोयाबीनचा पेरा झाला आहे. कपाशीचे सरासरी क्षेत्र १० लाख ७८ हजार हेक्टर असताना आतापर्यंत केवळ ७ लाख २८ हजार हेक्टरमध्येच (६७ टक्के) कपाशीचा पेरा आटोपला आहे. उर्वरित २० टक्के पेरण्यांमध्येही सोयाबीनचा वाटा अधिक राहण्याची चिन्हे आहेत. २००१-०२ मध्ये पश्चिम विदर्भात भाताचे सरासरी क्षेत्र १९ हजार हेक्टरवरून ते आता ५ हजार ८०० हेक्टपर्यंत खाली आले आहे. ज्वारीचे क्षेत्र ६ लाख हेक्टरवरून २ लाख ९० हजारावर स्थिरावले आहे. मूग, उडीद, सूर्यफूल या पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रातील घट फारशी नसली, तरी त्याचा परिणाम पीक रचनेवर झाला आहे. मुगाचे क्षेत्र दशकभरात २ लाख ८८ हजार हेक्टरहून २ लाख ५ हजारावर आले आहे. उडीदही १ लाख ८० हजार हेक्टरच्या तुलनेत १ लाख १० हजारापर्यंत कमी झाले आहे.
तेलबियांच्या बाबतीत सूर्यफूल, भुईमूग आणि तिळाच्या लागवडीत पश्चिम विदर्भ अग्रेसर होता. पण, सोयाबीनच्या लाटेत ही पिके झाकोळून गेली आहेत. विभागात तिळाचे सरासरी क्षेत्र ३२ हजार हेक्टरहून आता फक्त ९ हजार हेक्टर उरले आहे.
सूर्यफुलाच्या क्षेत्रात ४०० हेक्टरची किंचित घट झाली आहे. या सर्व पिकांची जागा सोयाबीनने मिळवली आहे. आतापर्यंत अमरावती विभागात ३ हजार ४६० हेक्टरमध्ये भाताची रोवणी झाली आहे. ज्वारीच्या सरासरी लागवडीखालील २ लाख ९० हजार हेक्टरच्या तुलनेत केवळ ९८ हजार हेक्टर म्हणजे ३४ टक्केच क्षेत्र ज्वारी पिकाखाली आले आहे. ४२ हजार हेक्टरमध्ये मका लागवड झाली आहे. बुलढाणा जिल्ह्य़ात सर्वाधिक मक्याचा पेरा आहे. तुरीच्या क्षेत्रात किंचित वाढ आहे. आतापर्यंत सरासरी ३ लाख ८२ हजार हेक्टरपैकी २ लाख ८६ हजारमध्ये म्हणजेच ७५ टक्के क्षेत्रात तुरीची लागवड झाली आहे. उडिदाच्या सरासरी १ लाख १० हजार हेक्टरपैकी ५२ हजार हेक्टरमध्ये (४८ टक्के) क्षेत्रात उडीद आहे. मुगाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ४ हजार हेक्टरमध्ये (५१ टक्के) मूग आहे. सर्वाधिक ३६ हजार हेक्टरमध्ये अकोला जिल्ह्य़ात मुगाचा पेरा आहे.
मान्सून वेळेवर आल्याने यंदा मुगाचा पेरा वाढला आहे. गेल्या दहा वर्षांत कापसाच्या भावातील चढउतार, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळला. पण, त्यामुळे कपाशीचे क्षेत्र घटलेच शिवाय, तीळ, सूर्यफूल, मूग या पिकांकडेही शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. पश्चिम विदर्भातील दशकभरापूर्वीची पिकांची बहुविविधता आता कमी झाल्याचे हे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा