वर्तकनगरचे पाणी पेटणारह्ण
ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे वर्तकनगर येथील ‘दोस्ती विहार’ संकुलात स्थलांतर करता यावे यासाठी ठाणे महापालिकेत युद्धपातळीवर हालचाली सुरू असतानाच नव्याने राहावयास येणाऱ्या सुमारे १४०० कुटुंबांना कोणाचे पाणी वळवायचे यावरून राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहे. वर्तकनगर परिसरातील अध्र्याहून अधिक परिसराला समतानगर येथील टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. या भागातील सुमारे तीन लाख रहिवाशांना आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. असे असताना नव्याने राहावयास येणाऱ्या १४०० कुटुंबांना दररोज लागणारे सुमारे २० लाख लिटर पाण्याची आधी तजवीज करावी, मगच त्यांचे स्थलांतर केले जावे, अशी भूमिका या परिसरातील काही नगरसेवकांनी दबक्या आवाजात घेण्यास सुरुवात केली आहे. समतानगर टाकीतील पाणी ‘दोस्ती विहार’साठी वळविल्यास उर्वरित परिसरात पाणीटंचाई निर्माण होईल, अशी भीती आहे. त्यामुळे स्थलांतराच्या प्रश्नासोबत या भागात पाणीप्रश्नही पेटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा या परिसरात सुमारे ११०० इमारती धोकादायक असून त्यापैकी ५७ इमारती अतिधोकादायक आहेत. मुंब्रा परिसरात शुक्रवारी पहाटे घडलेल्या दुर्घटनेनंतर या इमारती तातडीने पाडल्या जाव्यात, यासाठी महापालिकेने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. असे असले तरी या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे आधी स्थलांतर केले जावे, यासाठी राजकीय दबाव वाढतो आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यावरून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने वर्तकनगर भागातील ‘दोस्ती विहार’ या रेन्टल हाऊसिंगसाठी बांधण्यात आलेल्या संकुलातील १४०० घरांचे यापूर्वीच महापालिकेकडे स्थलांतर केले आहे. मुंब्रा परिसरातील सुमारे एक हजार कुटुंबांचे स्थलांतर या संकुलात केले जाऊ नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे या प्रश्नावरून यापूर्वीच जातीय राजकारण सुरू झाले आहे. असे असताना वर्तकनगर भागात नव्याने राहावयास येणारी १४०० कुटुंबे कुठलीही असली तरी त्यामुळे पायाभूत सुविधांचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती आता या भागातील काही राजकीय नेत्यांना वाटू लागली आहे.
पाणी आणायचे कोठून?
सद्यस्थितीत वर्तकनगर भागात समतानगर येथील टाकीतून पाण्याचा पुरवठा केला जातो. या टाकीत दररोज २४ दक्षलक्ष लिटर इतके पाणी जमा होते आणि ते या भागातील रहिवाशांना पुरविले जाते. या टाकीमधून शास्त्रीनगर, भीमनगर, लोकमान्यनगर, समतानगर, ज्ञानेश्वरनगर, विजयनगर, फुलेनगर, ‘म्हाडा’ वसाहतीत पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत या सर्व परिसराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी ४० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेच्या कोटय़ामधून जादा पाणी मिळत नसल्यामुळे या परिसरात पाणीपुरवठा नियमित नसतो, असे या भागातील ठरावीक नगरसेवकांचे म्हणणे आहे. लोकमान्यनगर परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे या परिसरातील रहिवासी महापालिकेच्या कारभारावर नाराज आहेत. असे असताना स्थलांतरित १४०० कुटुंबांना दररोज लागणारे किमान २० लाख लिटर पाणी समतानगरच्या टाकीतून द्यायचे झाल्यास लोकमान्यनगर तसेच आसपासच्या परिसरातील पाण्याची टंचाई आणखी वाढेल, अशी भीती या भागातील एका ज्येष्ठ नगरसेवकाने वृत्तान्तशी बोलताना व्यक्त केली. एमएमआरडीएने ठाणे परिसरात रेन्टल हाऊसिंग योजनेची घरे उभारल्यामुळे भविष्यात शहरातील पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडणार आहे. वर्तकनगर भागात १४०० कुटुंबांचे स्थलांतर होत असताना इतर भाडेपट्टय़ाच्या घरातून आणखी ४५०० कुटुंबेही या ठिकाणी नव्याने राहावयास येणार आहेत. या सर्वाना लागणारे पाणी आणायचे कोठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, १४०० कुटुंबांचे स्थलांतर करताना त्यांना लागणाऱ्या अतिरिक्त पाण्याची तजवीज कशा प्रकारे केली जावी, याचा अभ्यास केला जात आहे, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. वर्तकनगर भागाला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.