सहकार तत्त्वावरील ९ हजारपकी ७ हजार प्राथमिक दूध संस्था बंद पडल्या. दूध संघ केवळ महानंदचे संचालकपद मिळविता येईल, एवढयापुरतेच कसे-बसे चालविले जाऊ लागले. ३८ लाख लिटर दूधसंकलन क्षमता असल्याची आकडेवारी पशुसंवर्धन विभागाकडे आहे. मात्र, फारसे काहीच घडत नसल्याने राष्ट्रीय दूध विकास मंडळाशी केलेल्या करारामुळे मराठवाडय़ात येत्या ५ वर्षांत ८ लाख दूध संकलनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मराठवाडा, विदर्भात या साठी २ हजार नवीन केंद्रांबरोबरच ५६० मोबाईल वाहनांवर कृत्रिम रेतनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. नव्या करारामुळे न्यू जनरेशन कंपनी स्थापन होणार होणार असून दूध उत्पादकांना दुधाच्या प्रमाणात कंपनीच्या रोख्यातही हिस्सा मिळणार आहे.
राज्यात होणाऱ्या दूध संकलनात मराठवाडय़ाचा केवळ एक टक्के हिस्सा आहे. पशुगणनेनुसार ६ लाख ५२ हजार गायी दुभत्या आहेत. म्हशींची संख्या सुमारे ४ लाख ८५ हजार आहे. एकूण पशुसंख्येचा विचार करता प्रजननक्षमता कमी असणाऱ्या जिल्ह्यात कृत्रिम रेतनाचे प्रयोग हाती घेण्यात येणार आहेत. एकूण संकलित होणारे दूध लक्षात घेता राष्ट्रीय दूध विकास मंडळाने २ हजार नवीन सभासद तयार केले जातील. संकलित केलेल्या दुधावर नागपूर येथे प्रक्रिया होणार आहे. नवीन कंपनी अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत सर्व कारभार मदर डेअरी फ्रूट कंपनीमार्फत केला जाणार आहे.
दूध वाढवायचे असेल, तर चारा विकास करावा लागणार आहे. चारा लागवडीचे धडक कार्यक्रम मराठवाडय़ात घेतले जाणार आहेत. दूधसंकलन होऊ शकेल, अशा गावांची यादी तयार करण्यात आली आहे. सहकारी दूध संस्था कार्यरत आहेत, तेथे हा उपक्रम हाती घेतला जाणार नाही. त्यामुळे मराठवाडय़ात दूध वाढेल, अशी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. पाच वर्षांनी दूधसंकलन वाढल्यानंतर त्याच्या बाजारपेठेतील खरेदी-विक्रीची प्रक्रिया राष्ट्रीय दूध मंडळाकडून होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७५ हजार लिटर दूधसंकलन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
विदर्भ व मराठवाडय़ात तीन जिल्हा दूध संघ, तर २ तालुका दूध संघ पूर्णपणे बंद आहेत. मात्र, सुरू असणाऱ्या दूध संस्थांची स्थिती फारशी चांगली नाही, याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader