महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निषेध नोंदविणाऱ्या नगरसेवकांना ‘टीनपाट’ व डी-गँग असे पत्रकार बैठकीत संबोधत खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेली वक्तव्ये त्यांना अडचणीची ठरतील, असे चित्र निर्माण झाले आहे. नगरसेवकांचा डी-गँग म्हणून केलेला उल्लेख, दलित म्हणून हिणविणारा असल्याने येत्या २४ तासांत खासदार खैरे यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला जाईल, असे नगरसेवक मिलिंद दाभाडे, अमित भुईगळ व राजू शिंदे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत सांगितले. खड्डय़ांवरून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा राजकारण करत असल्याचा आरोप शनिवारी खैरे यांनी केला होता. या पत्रकार बैठकीत निषेध करणाऱ्या नगरसेवकांची डी-गँग असल्याचे ते म्हणाले होते. खैरे यांच्या वक्तव्यामुळे दलित समाजात त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा त्यांना फटका बसेल, असे नगरसेवक राजू शिंदे यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्या विरोधात वर्तमानपत्राच्या बॅनरखाली आंदोलन करून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा राजकारण करीत असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. महापालिकेतील सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी खासदार खैरे यांचा केलेला निषेध राजेंद्र दर्डा यांनीच घडवून आणला, असेही खैरे पत्रकार बैठकीत म्हणाले. आरोप करताना काही नगरसेवकांचा उल्लेख त्यांनी ‘डी-गँग’ असा केला होता. विशेषत: मिलिंद दाभाडे व अमित भुईगळ यांच्यावर त्यांचा रोष होता. डी-गँग या शब्दाचा अर्थ दलित असा असल्याचे सांगत मिलिंद दाभाडे, अमित भुईगळ व राजू शिंदे यांनी रविवारी पत्रकार बैठक घेतली. महापालिकेचे तीन-तेरा वाजविण्यात खासदार खैरे यांचीच महत्त्वाची भूमिका असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला. दाभाडे म्हणाले की, महापालिकेतील खैरे यांची हिटलरशाही आम्ही संपवू. आता दलितही सुशिक्षित आहेत. ते मतदानातून दाखवतीलच. मात्र दलित समाजाची २४ तासांत माफी मागितली नाही तर न्यायालयात दाद मागितली जाईल. मागील १५ वर्षांत खासदार खैरे यांनी केलेल्या खासदार निधीच्या विनियोगाचे सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खैरे हे खासदार असले तरी त्यांचे सगळे लक्ष महापालिकेत असते. त्यांना महापालिका म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे, असेच वाटते, असा आरोपही दाभाडे यांनी केला. समांतर जलवाहिनी योजना रखडवून ठेवण्यातही खासदार खैरे यांचीच महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यावर खैरे यांनी केलेल्या आरोपांना मंत्र्यांनी न घाबरता उत्तर द्यायला हवे, असे आवाहनही दाभाडे यांनी पत्रकार बैठकीत केले. राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागल्याने ते बेताल वक्तव्य करीत आहेत, असा आरोप राजू शिंदे यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा