कोल्हापूर जिल्ह्य़ातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पूरपरिस्थिीस तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगून अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबत समन्वय ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. तर, जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय रहावा यादृष्टीने दोंन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी आत्तापासून नियोजन करावे, अशी सूचना केली.
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आगामी काळात जादा पावसाने अलमट्टी धरणाची पाणीपातळी वाढल्यास त्या अनुषंगाने कोणत्या उपाययोजना कराव्यात याच्या सूचना केल्या. मंत्री पाटील म्हणाले,‘‘कोल्हापूर, सांगली, बेळगाव या तीन जिल्ह्य़ाच्या अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवावा. आवश्यक भासल्यास कर्नाटक सरकारशी मंत्रीपातळीवर बोलण्याची राज्य शासनाची तयारी आहे. अलमट्टी धरणाच्या पाणीपातळी पाहण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची सूचना त्यांनी केली. दरम्यान, सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता खलील अन्सारी, कर्नाटकातील चिकोडीचे सहायक आयुक्त रूद्रेश घळी, अलमट्टी धरणाचे अधीक्षक अभियंता तसेच हुबळी, निपाणी, अथणी, चिकोडी येथील कर्नाटक राज्याच्या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.    
संभाव्य पूरस्थितीत महाराष्ट्रातील भूभाग पाण्याखाली जाणार नाही, यादृष्टीने राजापूर बंधार तसेच अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचे समन्वयाने नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी माने यांनी केली. ते म्हणाले, की गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट पाऊस झाला असून आगामी काळात जादा पाऊस झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्यादृष्टीने दोंन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी नियमित संपर्कात राहून पाणी सोडण्याचे नियोजन करावे.     
कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ातील पंचगंगा – कृष्णा नदीकाठावरील गावांना पुराचा धोकाचा टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी तसेच विसर्ग सोडण्याबाबत आजच्या बैठकीत दोंन्ही अधिकाऱ्यांत समन्वयाच्या दृष्टीने व्यापक चर्चा झाली. अलमट्टी धरणाची पाणीपातळी ५१९.६० मीटर असून सध्या ५१७.२२ मीटर पाणीपातळी असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या धरणातून सध्या २२ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याचेही सांगण्यात आले. या धरणातील पाणीपातळी १ मीटरने कमी ठेवल्यास राजापूर बंधाऱ्याला पाण्याचा फुगवटा लागणार नाही, असे निदर्शनास आणून दिल्यानंतर अलमट्टीधरण प्रशासनाने सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. पूर नियंत्रणासाठी सांगली पाटबंधारे विभागात २४तास पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला असून तेथे ०२३३-२३०४३४० या क्रमांकावर संपर्क साधता येईल. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रणाकडे ७८ कोटी देण्यात आले असून पूरस्थितीत बचाव व मदत कार्यासाठी विशेष पथके निर्माण केली असल्याचे माने यांनी सांगितले.