नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांच्या घरातील व्यक्ती हल्ल्यात ठार झाल्यास या पुढील काळात ५ लाख रुपयांची मदत केली जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. पोलीस पाटलांच्या मानधनात लोकसभा निवडणुकीनंतरच वाढ करणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.
पठण येथे आयोजित जाहीर सभेत पाटील बोलत होते. नक्षलग्रस्त भागात पोलीस पाटील महत्त्वाचे काम करीत आहेत. पोलीस पाटलांनी राजकारण करायचे नसते, असे सांगून कसे वागावे, कसे वागू नये, याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. बाजारात अनेक सर्वेक्षणे आली आहेत. पण पोलीस पाटलांचे सर्वेक्षण महत्त्वाचे असते. त्यात राज्यात राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचा दावाही पाटील यांनी केला.
पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष नागरगोजे आमदार संजय वाघचौरे आदींची उपस्थिती होती. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा ६०वरून ६५ केली आहे. पण ६०व्या वर्षी व सेवानिवृत्ती मिळाली तर नव्यांना संधी मिळते, असे ते म्हणाले. हीच बाब राजकीय क्षेत्रासही लागू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पोलीस प्रामाणिकपणे करीत असल्याचा दावा पाटील यांनी या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा