इतर तेलबियांचा पेरा निम्म्यावर आला
पश्चिम विदर्भात ९० टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपलेल्या असताना सर्वाधिक १५ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाने व्यापले गेले आहे. पण, तीळ, सूर्यफूल यासारख्या तेलबिया पिकांचा पेरा झपाटय़ाने कमी होत असून दहा वर्षांत तो निम्म्यावर आला आहे. सोयाबीन वगळता इतर तेलबियांची पिके केवळ ५ हजार ३०० हेक्टरमध्ये आकुंचित झाली आहेत.
दशकभरापूर्वी सोयाबीनसह एकूण तेलबियांचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र साडेतीन लाख हेक्टर होते. त्यात सोयाबीनचा पेरा २ लाख ७५ हजार हेक्टरचा होता. सर्वाधिक सोयाबीन अमरावती जिल्ह्य़ात घेतले जात होते. नंतरच्या काळात सोयाबीनची शेतकरीप्रियता वाढत गेली आणि सोयाबीनचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ११ लाख हेक्टपर्यंत जाऊन पोहोचले. गेल्या काही वर्षांत सोयाबीनच्या भावातील चढउतार, केसाळ अळीसह रोगांचा प्रादुर्भाव, कमी उत्पादकता यातूनही शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीचा कल कमी झालेला नाही. यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनच्या लागवडीचा उच्चांक गाठला गेला आहे. सरासरी लागवडीखालील क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे १४ लाख ८० हजार हेक्टरवर (१३४ टक्के) सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक ३ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्य़ात आहे.
पश्चिम विदर्भात दशकभरापूर्वी तिळाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ३३ हजार हेक्टर होते. ते आता ९ हजार ३०० हेक्टपर्यंत खाली आले आहे. यंदा तर केवळ ३ हजार म्हणजे ३२ टक्के क्षेत्रात तिळाचा पेरा झाला आहे. तिळाच्या किमती वाढण्यामागे कमी पेरा हे मुख्य कारण मानले जात आहे. बाजारातून तिळाचे तेलही गायब झाले आहे. तिळाची लागवड ही केवळ बांधापर्यंत मर्यादित झाली आहे. घरच्या वापरासाठी तीळ लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा हेतू आहे. तीळ व्यापारासाठी पिकवणे पश्चिम विदर्भात आता जवळपास बंद झाल्याचे हे संकेत आहेत. बुलढाणा जिल्ह्य़ात सर्वाधिक १ हजार ४५ हेक्टरमध्ये तिळाचा पेरा आहे. उन्हाळी भुईमुगाची लागवड काही भागात वाढली असली, तरी खरिपात गेल्या दशकभरात भुईमूग लागवड झपाटय़ाने कमी झाली आहे. २००२-०३ मध्ये अमरावती विभागात भुईमुगाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र २३ हजार हेक्टर होते. ते आता फक्त १५०० हेक्टरवर आले आहे. यंदा खरीप हंगामात केवळ १ हजार ४३७ हेक्टरमध्ये भुईमुगाचा पेरा झाला आहे.
पश्चिम विदर्भात सूर्यफूल आणि कारळची लागवड लक्षणीय होती. हा शब्ददेखील आता इतिहासजमा झाला आहे. सुर्यफूलाच्या सरासरी १२ हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ६१२ हेक्टरमध्ये सुर्यफुलाची लागवड झाली आहे. कारळ तर पूर्णपणे हद्दपार झाले आहे. याशिवाय, इतर तेलबियांचा पेरा देखील घटला आहे. दहा वर्षांपूर्वी इतर तेलबियांचे क्षेत्र २२०० हेक्टर होते. ते १६०० हेक्टरवर आले आहे आणि आतापर्यंत केवळ ११४७ हेक्टरमध्ये हा पेरा झाला आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढल्यामुळे इतर पिकांवर परिणाम झालाच आहे. पण, तेलबियांच्या बाबतीत तो लक्षणीय ठरला आहे. शेतांमध्ये आता तीळ दिसत नाही, ही खंत शेतकरी देखील व्यक्त करताना दिसत आहेत. पण, हा बदल शेतकऱ्यांनीही स्वीकारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा