मे महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने नांदेडकर चांगलेच हैराण झाले आहेत. मंगळवारी पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसपर्यंत मजल गाठली.
जिल्ह्य़ात यंदा सुरुवातीपासूनच उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सकाळी ८-९ वाजताच उन्हाचे चटके बसण्यास प्रारंभ होतो. दुपारनंतर सर्वच प्रमुख रस्त्यांवर संचारबंदी सदृश स्थिती दिसते. एकीकडे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई व दुसरीकडे उन्हाचा तडाखा अशा कात्रीत नागरिक सापडले आहेत.
उन्हामुळे वेगवेगळ्या आजारांतही लक्षणीय वाढ झाली आहे.
विशेषत: लहान मुलांना तापाच्या आजाराने हैराण केले आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आवश्यकता नसल्यास उन्हात फिरू नका, फिरायचे असल्यास पांढरा रुमाल वापरा. जास्तीत जास्त पाणी प्या. कोणत्याही आजाराचे लक्षणे दिसल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानातील वाढ आणखी काही दिवस राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने खासगी पाणीविक्रीचा व्यवसायही तेजीत आला आहे. या व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या नावाने सीलबंद पाण्याची विक्री होत असली, तरी त्यापैकी किती पिण्यास योग्य हाही संशोधनाचा विषय आहे.

Story img Loader