शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाच्या उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव यांनी केले. जिल्हय़ाच्या काही भागांत गारपिटीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आमदार सातव यांच्या हस्ते दांडेगाव येथे आयोजित कार्यक्रमात अनुदान वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी दिलीप देसाई होते. जगदेवराव सोळंके, बबन जामगे आदींची या वेळी उपस्थिती होती. दांडेगाव परिसरात ४८५ शेतकऱ्यांच्या केळीपिकाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २७ लाखांचे अनुदान वाटप करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी दिली. सातव म्हणाले, की चालू वर्षांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पुनर्वसनमंत्र्यांची भेट घेऊन मंजुरी मिळविल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पाण्याचे स्रोत बळकट करीत पावसाचे थेंब वाया जाणार नाही, यासाठी सिंचनावर अधिक भर द्यावा. शेतात सिमेंट बंधारा घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा