जीवनदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्ताच्या कि मतीतही आता भरमसाठ वाढ झाली आहे. शासकीय रक्तपेढीत ४५० रुपयाला मिळणारी रक्ताची एक पिशवी आता १०५० रुपयांत तर खासगी रक्तपेढीत ८५० रुपयाला मिळणारी रक्ताची पिशवी आता १४५० रुपयांना खरेदी करावी लागणार आहे.
रुग्णाला निकोप रक्त पुरवठा करणे हे शासकीय व निमशासकीय रक्तपेढीचे कर्तव्य आहे. प्राप्त रक्तावर विविध चाचण्या केल्यानंतरच ते रक्त रुग्णाला उपलब्ध करून दिले जाते. परंतु रक्ताच्या विविध चाचण्या करण्यांसाठी खर्चाचे प्रमाण वाढले असल्याने जुन्या किमतीत रक्त विकणे हे रक्तपेढींना नुकसानीचे ठरू लागले. त्यामुळे ‘दि फेडरेशन ऑफ नागपूर ब्लड बँक’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली. विविध चाचण्यांचा खर्च वाढल्याने दरात वाढ करण्याचे आदेश राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेला द्यावे, अशी विनंती याचिकेत केली होती. या प्रकरणी एक समिती स्थापन करावी व या समितीने रक्ताचे दर ठरवावे व त्याला राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने मंजुरी द्यावी, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेला न्यायालयाने दिले होते.
त्यानुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्त व रक्त घटकांची प्रक्रिया, चाचणी शुल्कात सुधारणा करण्यासाठी खासगी रक्तपेढी, रेड क्रॉस सोसायटी, शासकीय रक्तपेढी, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली १६ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने रक्ताच्या विविध चाचण्यासांठी किती खर्च येतो, याचा अभ्यास करून रक्ताचे सुधारित दर निश्चित केले. त्यानंतर सुधारित सेवा शुल्काचा हा प्रस्ताव राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावास राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने हिरवी झेंडी दाखवली आहे. या दरानुसार आता खासगी रक्तपेढय़ांमध्ये रक्ताची एक पिशवी १४५० रुपये देऊन विकत घ्यावी लागणार आहे. रेड सेल (लाल घटक) असलेले रक्तही आता १४५० रुपये देऊनच खरेदी करावे लागणार आहे. प्लाझमा आणि प्लेटलेटच्या दरात मात्र वाढ करण्यात आली नाही. याचे दर ४०० रुपये प्रति युनिटच ठेवण्यात आले आहे. शासकीय रक्तपेढीत रक्ताची एक पिशवी ४५० रुपयाला मिळत होती. ती सुधारित दरानुसार आता १०५० रुपयाला मिळणार आहे. त्यानुसार रेड सेल (लाल घटक) सुद्धा १०५० रुपये देऊन घ्यावे लागणार आहे. शासकीय रक्तपेढीत प्लाझमा आणि प्लेटलेटच्या किंमती मात्र कमी करण्यात आल्या आहेत. पूर्वी ४५० रुपयात उपलब्ध होणारे प्लाझमा आणि प्लेटलेट ३०० रुपयात उपलब्ध होणार आहेत. थॅलेसिमिया, हिमोफेलिया व सिकलसेल अॅनेमिया आजाराने बाधित रुग्णास राज्यातील शासकीय व खासगी रक्तपेढय़ांनी मोफत रक्त पुरवठा करण्याचे बंधन राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने घालून दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा