गारपीट आणि मुसळधार पावसानंतरही धान्य, मिरची, फळांचे भाव वाढल्याचे चित्र वरवर दिसत असले तरी ही वाढ शेतकऱ्यांच्या अजिबात फायद्याची नसल्याचे स्पष्ट होते.
गेल्या आठवडय़ातील पावसामुळे शेतकऱ्यांची झालेली दाणादाण सर्वश्रुत आहे. अतिवृष्टीपूर्वी कळमना मार्केटमधील विविध वस्तूंचे भाव अतिवृष्टीनंतर अचानक वाढले. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे वरकरणी वाटत असले तरी वाढीव भाव केवळ अडत्याच्या फायद्याचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. कांदा वगळता बाकी सर्वच वस्तूंचे भाव अतिवृष्टीनंतर वाढले आहेत. बटाटय़ाचे भाव प्रती क्विंटल ४१० ते ४५० होते. अतिवृष्टीनंतर ते ५०० ते ६०० रुपये झाले. कांदा ३५० ते ४०० रुपये प्रती क्विंटल होता तो ३०० ते ३८० प्रती क्विंटल झाला. लसूण आधी १६०० ते १८०० प्रती क्विंटल, तर पावसानंतर २००० ते २४०० पर्यंत वाढला आहे. मिरची दहा किलोमागे ६५० ते १००० रुपये होती. ती ८०० ते १२०० झाली. धान्य बाजारात तुरी प्रती क्विंटल ३५०० ते ३९०० होती. पावसानंतर त्याचे भाव ४००० पर्यंत गेले. हरबरा २५०० ते २७०० प्रती क्विंटल होता. तो पावसानंतर ३००० ते ३२०० पर्यंत गेला. सोयाबीनचे प्रती क्विंटलचे भाव ३४०० ते ३५०० होते. ते ३६०० ते ३९०० पर्यंत आले आहेत. संत्रा पावसापूर्वी टनामागे ३५०० रुपये होता तो ४००० ते ५००० पर्यंत गेला आहे.
वाढीव भावाने शेतकऱ्यांना वाढीव किंमत मिळेल, असे सांगितले जात असले तरी सध्या कळमना मार्केटमध्ये जो माल विकला जात आहे तो अडत्यांच्या खळे किंवा गोदामातील आहे. त्यामुळे वाढीव भावाचा फायदा मोजक्या शेतकऱ्यांशिवाय अडत्यालाच मिळणार आहे. हा माल मर्यादित होता, पण आता जेव्हा शेतकरी मार्केटमध्ये धान्य, मिरची, फळे किंवा बटाटे आणतील तेव्हा मालाची आवक जास्त होईल. साहजिकच मालाचे भाव पडतील, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच वाढीव भाव शेतकऱ्यांच्या किती फायद्याचा? किती तोटय़ाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाढीव भाव शेतकऱ्यांच्या फायद्याचे की तोटय़ाचे?
गारपीट आणि मुसळधार पावसानंतरही धान्य, मिरची, फळांचे भाव वाढल्याचे चित्र वरवर दिसत असले तरी ही वाढ शेतकऱ्यांच्या अजिबात फायद्याची नसल्याचे स्पष्ट होते.
First published on: 04-03-2014 at 08:47 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increased rates profitable or loss for farmers