वाई पालिकेचा २० लाख ८० हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प पालिका सभेत आज मंजूर करण्यात आला. पाणीपट्टीत चारशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला. नगराध्यक्ष नीलिमा खरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी सचिन पवार यांनी अर्थसंकल्प मांडला.
अर्थसंकल्पात ८० लाख ४० हजार आरंभीची शिल्लक दाखवण्यात आली असून, जमेच्या बाजूला सर्व बाबींपासून मिळणारे एकूण उत्पन्न १५ कोटी ७४ लाख ८८ हजार ६८५ रुपये गृहीत धरण्यात आले आहे. सर्व विकासकामांवर १६ कोटी ५५ लाख २९ हजार ३३१ रुपये अपेक्षित धरण्यात आले असून, वर्षअखेरीला २० लाख ८० हजार शिल्लक दाखविण्यात आला आहे.
पाणीपुरवठा योजनेचे उत्पन्न व खर्चातील तूट कमी करण्यासाठी पुढील वर्षांसाठी रहिवास पाणीवापरासाठी ४०० रुपये तर हद्दीबाहेर ७०० रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. (पूर्वीची ११०० वाढीनंतर १५००) याशिवाय मैलागाडी, पिण्याचे पाणी, अग्निशमनभाडे, फटाका स्टॉल भाडे, चित्रीकरण, वृक्षतोड, मालमत्ता नोंदणी, व्यवसायासाठी ना हरकत दाखला देण्याच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, अर्थसंकल्प तयार करणाऱ्या जनकल्याण आघाडीने दोन दिवसांपूर्वी सत्तांतर झाल्याने पाणीपट्टीच्या वाढीला विरोध दर्शविला. या वेळी झालेल्या चर्चेत जनकल्याण आघाडीच्या वतीने नंदकुमार खामकर, सचिन फरांदे, वर्षां शेवडे, महेंद्र धनवे यांनी भाग घेतला. तर तीर्थक्षेत्र आघाडीच्या वतीने डॉ. अमर जमदाडे, अनिल सावंत, दत्तात्रय खरात यांनी भाग घेतला.
कार्यालयीन अधीक्षक राजन बागूल व नितीन नायकवडी यांनी तरतुदीची माहिती दिली. यामध्ये ठळक खर्चाच्या बाजू म्हणून आस्थापन, पेन्शन, अग्निशामक, रस्त्यावरील दिवाबत्ती, पाणीपुरवठा, जंतुनाशक, गटार बांधकाम, नैसर्गिक आपत्ती, रस्ते डांबरीकरण, दुर्बल घटक योजना, साफसफाई, महिला व बालकल्याण विभाग आदी बाबी दाखविण्यात आल्या आहेत.