रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ‘रेल्वे सुरक्षा बल’ आणि रेल्वे पोलिसांकडून पाहिली जाते. अपुरे पोलीस बळ, अत्याधुनिक सामग्रीची कमतरता या गोष्टी जुन्याच आहेत. पण गेल्या काही महिन्यांत रेल्वे स्थानकातील प्रवाशांची लूट, चोरी, लहान बाळांचे अपहरण, महिलांची छेडछाड आदी घटना पाहता रेल्वेची सुरक्षा तकलादू असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रीती राठोड या तरुणीवर वांद्रे स्थानकात अलीकडेच सकाळी ८च्या सुमारास अॅसिड हल्ला झाला, पण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फारसा उपयोग झाला नाहीच; उलट आरोपीही आरामात स्थानकातून फरार झाला.
सीसीटीव्हीची कमतरता
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर केला जातो, पण रेल्वेच्या परिसरात अद्याप पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत आणि जे आहेत त्यांचा दर्जा चांगला नाही. ही बाब खुद्द रेल्वे पोलीस आयुक्त प्रभात कुमार यांनीच मान्य केली आहे. यासंदर्भात शासनदरबारी पाठपुरावादेखील केला गेला आहे. परदेशातील रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे ९० टक्क्यांहून अधिक परिसराचे चित्रण करतात, पण आपल्याकडे पुरसे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. दादरसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातून नुकतेच एक बाळ चोरण्यात आले होते. या स्थानकात २४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अपहरणकर्ता तब्बल ४ तास या ठिकाणी घुटमळत होता, पण सीसीटीव्ही कॅमेरे बघण्यासाठीच कुणी नव्हते. दादरसारख्या स्थानकाची ही अवस्था असेल तर अन्य स्थानकांबद्दल न बोललेलेच बरे.
महत्त्वाच्या स्थानकांशिवाय इतरत्र पोलीस नाहीत
प्रत्येत रेल्वे स्थानकात सरासरी ४ ते ६ प्रवेशमार्ग असतात. या प्रत्येक प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आणि पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक असतो, पण तो बहुतांश ठिकाणी दिसून येत नाहीत. याबाबत रेल्वेला विचारले असता त्यांचे कारण एकच असते की पुरेसे मनुष्यबळ नाही.
३० टक्के पोलीस बळ कमी.
रेल्वे पोलिसांकडे आजमितीला सुमारे ३० टक्के पोलीस बळ कमी आहे. जे पोलीस आहेत ते ‘हप्तावसुली’त व्यस्त असल्याचा आरोप रेल्वे विषयावर गेली काही वर्षे काम करणारे कार्यकर्ते समीर झवेरी यांनी केला आहे. रेल्वेच्या हद्दीत मोठा भ्रष्टाचार चालतो. अनधिकृत फेरीविक्रेत्यांकडून मोठा हप्ता मिळतो. रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी याच कामात व्यस्त असतात. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरेक्षेचे त्यांना काय पडलेय, असा सवाल झवेरी यांनी केला आहे.
पुरेसे खबरी नाहीत
एकीकडी पोलीस बळ पुरेसे नसताना गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अथवा गुन्ह्य़ाचा माग काढण्यासाठी आवश्यक असलेले खबरी नसल्याची माहिती एका रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे तपास लावणे कठीण जात आहे.
चेनसाखळी चोरी आणि पाकिटमारी वाढली
उपनगरी गाडय़ांमधील प्रवाशांचे मोबाइल, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणे आदी घटना वाढत आहेत. तसेच महिलांची छेडछाड आणि विनयभंगाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळेच पोलिसांनी महिला छेडछाड विरोधी पथक स्थापन केले आहे.
अपहरणाच्या घटना रोखण्यासाठी रात्री रेल्वे स्थानकात योग्य तिकीट नसलेल्या प्रवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना थांबण्यास मनाई करण्यात आली होती, पण हा आदेश काही दिवसानंतर बारगळला. त्यामुळे भिकारी, तृतीयपंथी, दलाल आदींचा सुळसुळाट रात्रीच्या वेळी रेल्वे स्थानकांमध्ये पाहायला मिळतो.
अपुरे बळ, अपुरी सामग्री, प्रवाशांची सुरक्षा बेभरवशाची
रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ‘रेल्वे सुरक्षा बल’ आणि रेल्वे पोलिसांकडून पाहिली जाते. अपुरे पोलीस बळ, अत्याधुनिक सामग्रीची कमतरता या गोष्टी जुन्याच आहेत. पण गेल्या काही महिन्यांत रेल्वे स्थानकातील प्रवाशांची लूट, चोरी, लहान बाळांचे अपहरण, महिलांची छेडछाड आदी घटना पाहता रेल्वेची सुरक्षा
First published on: 09-05-2013 at 12:51 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increaseing crime incidents in railway