महिलांवर अत्याचारांच्या घटनांत होणारी वाढ ही चिंतेची बाब असली तरी दुसरीकडे आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. महिलांचा गुन्हेगारीतील सहभाग क्रमाक्रमाने वाढतो आहे. मुंबईसह राज्यात महिलांचा गुन्ह्य़ातील सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकटय़ा मुंबईचाच विचार केला तर महिला गुन्हेगारांच्या संख्येत मागील वर्षी १३ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.
मायानगरी मुंबईत महिलांवर सातत्याने अत्याचार होतात. सरासरी रोज एक बलात्कार होतो. पण त्याच वेळी महिला गुन्हेगारांची संख्याही वाढली आहे. मुंबईत दररोज ७ ते ८ महिलांना विविध गुन्ह्य़ांत अटक होत असते. त्यात अगदी छोटय़ा चोऱ्यांपासून ते अपहरण, हत्या आदी गंभीर गुन्ह्य़ांचाही सहभाग आहे. २०११ या वर्षांत मुंबईत २५९९ महिलांना अटक झाली होती. २०१२ मध्ये ही संख्या ६१ ने कमी म्हणजे २५३८ महिलांना अटक झाली. परंतु २०१३ या वर्षांत ही संख्या पुन्हा वाढली. या वर्षांत २७९७ महिलांना अटक झाली. ही आकडेवारी केवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आहे.
कुठले गुन्हे करतात महिला?
महिलांचा सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत सहभाग आहे. त्यात अगदी रस्त्यावरील फुटकळ चोरीपासून हत्येपर्यंतच्या गुन्ह्यांच्या समावेश आहे. परंतु सर्वाधिक गुन्हे चोरीचे आणि फसवणुकीचे असल्याचे आढळते.
राजस्थानी महिलांची टोळी
दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी पाच राजस्थानी महिलांना अटक केली होती. या महिला चक्क घरफोडी करायच्या. मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या महिला बंद दुकानांचे शटर्स तोडण्यात वाकबगार आहेत. त्यातील दोन महिला पाळत ठेवायच्या आणि इतर महिला शटर्स तोडायच्या. त्यांचे राहणीमान चांगले असायचे. त्यामुळे कुणाला संशय येत नसे. या महिला २० ते ४० वर्षे वयोगटातल्या आहेत.
पाच सख्ख्या बहिणींची टोळी
गुन्हे शाखा ५ च्या पथकाने मध्यंतरी चोरीच्या प्रकरणात पाच बहिणींना अटक केली. त्यांची चोरीची पद्धत एकदम थक्क करणारी होती. या पाचही बहिणी विवाहित आणि चांगल्या घरातील होत्या. बोलण्यात प्रभुत्व आणि त्यांचेही राहणीमान चांगले असायचे. लोखंडी फुटपट्टीच्या सहाय्याने कुलूप उघडण्याची कला त्यांना अवगत होती. दिवसा त्या फिरून चोरीची जागा त्या हेरून ठेवायच्या. त्यांना एकत्र पाहून कुणी हटकत नसे की कुणाला संशय येत नसे. त्यातील दोन तीन बहिणी खाली उभ्या राहून लक्ष ठेवत. अन्य दोघी कुलूप तोडून चोरी करत. कुणी हटकलेच तर उलट अंगावर जात. खारमधील एका इमारतीत चोरी करतातना त्या सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना सापळा लावून अटक केली. त्यांच्यावर चोरीचे ६०-७० गुन्हे दाखल आहेत.
खंडणीखोर महिला
डीबी मार्ग पोलिसांनी एका राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी स्नेहल कशाळकर हिला खंडणी प्रकरणात अटक केली होती. प्राप्तिकर अधिकारी असल्याचे भासवून एका व्यापाऱ्याकडून तिने पाच लाखांची खंडणी उकळली होती.
मूल पळविण्यात महिलांचा सहभाग
रस्त्यावर झोपलेले किंवा रुग्णालयातील नवजात बाळे पळविण्यात महिलांचा मोठा सहभाग आहे. वाडिया रुग्णालयातून तान्हुले पळविणारी महिलाच होती. अद्याप तिचा शोध लागलेला नाही. गावदेवी पोलिसांनीही रस्त्यावरील मूल पळविणाऱ्या अशाच एका महिलेला अटक केली होती. तर शिवाजी पार्क पोलिसांनी मुले पळविणाऱ्या टोळीतील ८ महिलांना अटक केली होती.
महिला गुन्हेगारांची संख्या वाढतेय
महिलांवर अत्याचारांच्या घटनांत होणारी वाढ ही चिंतेची बाब असली तरी दुसरीकडे आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. महिलांचा गुन्हेगारीतील सहभाग क्रमाक्रमाने वाढतो आहे.
First published on: 08-03-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing number of women criminals