लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत गल्लीबोळात पहारा ठेवत उत्तम वातावरणनिर्मिती करत आम्हीच खरे शहराचे ‘दादा’ असल्याचे दाखवून देणारे ठाण्याचे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांच्या पोलिसांना गेल्या पंधरवडय़ापासून चोर, दरोडेखोर आणि सोनसाखळी चोरांनी अक्षरश घाम फोडला असून ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हानगरात अगदी नेमाने दरोडे पडू लागल्याने जेमतेम दोन महिन्यांपूर्वी ठाण्यात आयुक्त म्हणून रुजू झालेल्या विजयरावांना चोर सलामी देऊ लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
गेल्या पंधरवडय़ात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या भागांत चोर, दरोडेखोर, सोनसाखळी चोरांनी अक्षरश धुमाकूळ घातला असून चोरांनी केलेल्या हल्ल्यात उल्हासनगरात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. रविवारी दिवसभरात ठाणे शहरातील कापूरबावडी, वागळे, नौपाडा, राबोडी तसेच मुंब्रा आणि नारपोली भागात तब्बल सात महिलांच्या गळ्यातल्या सोनसाखळ्या चोरांनी लांबविल्याने महिला वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच आठवडय़ात समतानगर तसेच डोंबिवलीत ज्वेलर्सवर दरोडे पडले असून जांभळी नाका परिसरात चार चोरटय़ांनी सोमवारी व्यापाऱ्यावर हल्ला करून १४ लाख रुपये चोरून नेल्याने व्यापारी वर्गातही दहशतीचे वातावरण आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे ठाण्यातील काही व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून जेमतेम पंधरवडय़ाच्या कालावधीत चोर, दरोडेखोर कमालीचे सक्रिय झाल्याने पोलीसही चक्रावले आहेत.
ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारून विजय कांबळे यांना दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. निवडणुकीच्या तोंडावर गुंडापुडांना जरब बसावी यासाठी कांबळे यांनी अन्नू आंग्रेसारख्या अट्टल गुंडांना मोक्का लावत तुरुंगात पाठविले. मुंब््रयासारख्या संवेदनशील भागात पोलिसांनी कोम्बिग ऑपरेशन केले.
निवडणुकीच्या काळात राजकीय गुंडांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले. या काळात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर या शहरांमध्ये पोलिसांनी गल्लोगल्ली जागता पहारा ठेवला. त्यामुळे निवडणुकीच्या काळात पोलीसच ‘दादा’ असल्यासारखे चित्र होते. निवडणुकीनंतर मात्र हे चित्र बदलले असून चोर, दरोडेखोर, सोनसाखळी चोरांनी पोलिसांना अक्षरश घाम फोडल्याचे चित्र दिसू लागले आहे.
खारफुटीही असुरक्षित
मुंब्रा, दिवा खाडी किनारा जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांच्या नियंत्रणाखाली असला तरी या खाडी किनारी मुंब्रा येथे पोलिसांची चौकी आहे. या चौकीच्या समोरील भागात वाळूमाफिया खारफुटीची झाडे तोडून दररोज वाळूचा उपसा करताना दिसतात. याविषयी महसूल विभाग झोपेत असला तरी पोलिसांनाही या बेकायदा खारफुटीच्या कत्तलेविषयी काही घेणेदेणे नसल्याचे चित्र आहे. मुंब्रा, दिव्यातील वाळूमाफियांकडे कानाडोळा करत या भागातील गैरधंद्यांना पोलिसांनी एकप्रकारे आशीर्वाद दिल्याची चर्चाही रंगली आहे. तत्कालीन आयुक्त के.पी. रघुवंशी आयुक्तपदी असताना त्यांनी काही काळ वाळूमाफियांना वेसण घातली होती. कांबळे यांच्या काळात पोलिसांच्या चौकीमागेच बिनधोकपणे वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
कांबळेंच्या कार्यपद्धतीवर निशाणा
विद्यमान आयुक्त विजय कांबळे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते चोरी, दरोडय़ाच्या घटना रोखण्यास प्रभावी उपाययोजना करतील अशी नागरिक तसेच व्यापाऱ्यांची अटकळ होती. मात्र, चोर-दरोडेखोरांनी अक्षरश उच्छाद मांडत आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मागील १५ दिवसांत ठाण्यातील समतानगर, वर्तकनगर, नौपाडा भागात जवाहिऱ्यांची दुकाने फोडण्याचे प्रकार घडून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे. जांभळीनाका येथे एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण करून लुटण्यात आले. डोंबिवलीत कस्तुरी प्लाझा या मध्यवर्ती भागात असलेल्या एका जवाहिऱ्याचे दुकान दिवसाढवळ्या लुटून नेण्यात आले. कल्याणमधील रोहन गुच्छेत या बालकाचे अपहरण तसेच हत्याप्रकरण पोलिसांनी अतिशय ढिसाळपणे हाताळले. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ आयुक्तांवर आली. ठाण्यात रस्त्याने चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातल्या सोनसाखळ्या चोरणे हा तर चोरांचा धंदाच बनला आहे. एकाच दिवशी सात महिलांच्या सोनसाखळ्या चोरून चोरांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सोनसाखळी चोरीच्या दररोज किमान सात ते आठ घटना घडत आहेत. यामधील बहुतांशी चोर हे भिवंडी परिसरातील असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हे भुरटे चोर नंतर सुटतात आणि पुन्हा चोरीमारी सुरू करतात, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.