कडाक्याच्या उन्हाने होरपळत असलेल्या विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. चढत्या पाऱ्याचा सर्वाधिक तडाखा यंदा वर्धा, चंद्रपूर जिल्ह्य़ाला बसला असून त्यापाठोपाठ नागपुरातही विक्रमी पाऱ्याची नोंद झाली आहे. दोन्ही शहरांचे तापमान तब्बल ४५ अंशांच्या वर पोहोचल्याने उष्माघात आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नवतपा सुरू होण्यापूर्वी विदर्भात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने येत्या आठवडय़ात सूर्य कोपलेलाच राहणार असल्याची चिन्हे आहेत.
सधन लोक बिसलरी, शीतपेये, आईस्क्रीमने शरीराचा दाह कमी करीत आहेत. अनेक लोक सकाळी आणि सायंकाळी जलतरण तलावांवरही हजेरी लावून जलक्रीडेचा आनंद लुटत आहेत. विदर्भात यावेळी उन्हाचा तडाखा आधीच्या नोंदींच्या तुलनेत जबरदस्त असून ज्यांच्याकडे पंखा, कूलर नाही अशी गरीब कुटुंबे दुपारचा वेळ झाडाच्या सावलीत काढत आहेत. अनेक घरांमधील लोक दुपारी बगिच्यांच्या आश्रयाला जाताना दिसत असून सायंकाळी घरी परतत आहेत. वाळ्याच्या ताटय़ांचे दिवस सरले असले तरी गरिबांच्या घरात तापमान कमी करण्यासाठी ताटय़ा लावलेल्या दिसतात. ग्रामीण भागात भारनियमनामुळे दुपार काढणे असह्य़ झाले आहे. उन्हाच्या झळा सहन करण्यापेक्षा लोक घरासमोर पाण्याचा शिडकावा करून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हॉटेल, धाबे, रेस्टॉरंटमध्ये कुलर, एसीची व्यवस्था आहे. अनेक दुकाने झाडांच्या आश्रयाने सुरू आहेत. खेडेगावातील मातीच्या घरांना उन्हाळ्यात एकदम महत्त्व आले आहे. मातीची घरे थंड ठेवण्यासाठी रोज शेण-मातीने सारवून पाऱ्याचा दाह कमी असावा, याची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळघाट, ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमधील शेकडो गावांमध्ये वीज पुरवठा नाही. त्यामुळे कौलारू घरे थंड करण्यासाठी अनेकांकडे हिरवी जाळी अंथरण्यात आली आहे.
शहरांमध्ये दुपारी घराबाहेर निघणारे तोंडाला दुपट्टे बांधूनच निघत आहेत. बुजुर्गाच्या सांगण्यानुसार अनेक जण जवळ कांदा बाळगतात, निघण्यापूर्वी आंब्याचे पन्हे वा ताक पिऊनच  बाहेर पडतात. कडक उन्हामुळे प्रकृतीवर परिणाम होऊन उष्माघात किंवा गॅस्ट्रोचा त्रास सुरू होतो. गेल्या आठ दिवसात एकटय़ा नागपूर शहरात साडेपाचशे गॅस्ट्रो रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून तिघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांना सुटय़ा असल्या तरी शिकवणी वर्ग जोरात सुरू आहेत. परंतु, वर्गाची वेळ एकदम सकाळी किंवा सायंकाळी अशी ठेवण्यात आली आहे. लग्नसराईचे दिवस असल्याने एरवी इतवारी, महाल, सक्करदरा, गोकुळपेठ सदर या भागात दुपारच्यावेळी दिसणारी गर्दी कमी झाल्यामुळे अनेक व्यापारी दुपारच्यावेळी तीन तास दुकान बंद करत आहेत. विदर्भात नागपूर ४४. ५, अकोला ४३.५, अमरावती ४३.४,  बुलढाणा ४०.२, ब्रम्हपुरी ४४.२, चंद्रपूर ४४, वाशीम ४१, वर्धा ४५.५ व यवतमाळला ४२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा