भारत-चीन युद्ध म्हणजे देशाच्या इतिहासावरील एक न पुसता येण्यासारखा ओरखडा. या युद्धाची ओळख सांगताना पराभवाचाच उल्लेख केला जातो; मात्र भारतीय जवानांनी या युद्धात दाखविलेले अपरिमित साहस कायम दुर्लक्षित राहिले आहे. या वर्षी या युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने साहसाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘ऑफबिट डेस्टिनेशन्स’ आणि ‘सक्षम फाउंडेशन’ यांच्यातर्फे या युद्धातील दुर्मिळ छायाचित्रांचे आणि तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या युद्धविषयक बातम्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
ऑफबिट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री आणि सक्षम फाउंडेशनचे कर्नल अवधूत ढमढेरे यांनी लष्कराकडे दोन वर्षे पाठपुरावा करून भारत-चीन युद्धाची १७४ छायाचित्रे मिळविली आहेत. ही छायाचित्रे या आधी कुठेही प्रकाशित झालेली नाहीत. १९६२ साली ‘दैनिक केसरी’त छापून आलेल्या नव्वद युद्धविषयक बातम्यांचा संग्रहही करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर लष्कराकडून आणि चित्रपट विभागाकडून मिळविलेल्या काही दुर्मिळ चित्रफितीही या ठिकाणी बघायला मिळणार आहेत.
१९ ते २१ नोव्हेंबर या काळात सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. १९ तारखेला सकाळी साडेदहा वाजता ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येईल. उद्घाटनानंतर महाजन यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले आहे. निवृत्त सनदी अधिकारी अजित निंबाळकर, कर्नल संभाजी पाटील, इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.     

Story img Loader