कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक आणि सध्या थायलंडच्या तुरुंगात असलेला कुख्यात गुंड मुन्ना मुज्जकिर मुद्देसर उर्फ मुन्ना झिंगाडा याला भारतात आणण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. तो भारतीय असल्याचा पुरावा दाखविण्यासाठी त्याच्या कुटुंबियांचे रक्ताचे नमुने पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी पाठविले आहेत. या चाचणीमुळे मुन्नाचे भारतीयत्व सिद्ध होईल, असा विश्वास मुंबई पोलिसांना वाटतो आहे.
दाऊद इब्राहिमचा हस्तक मुन्ना झिंगाडा याने २००० मध्ये बँकॉक येथे दाऊदचा कट्टर शत्रू छोटा राजनवर हल्ला केला होता. मुन्ना झिंगाडाने पाच साथीदारांच्या मदतीने ही योजना बनवली होती. या हल्ल्यात छोटा राजन आश्चर्यकारकरित्या बचावला होता. मात्र त्याचा विश्वासू साथीदार रोहित वर्मा मारला गेला. तेव्हापासून मुन्ना थायलंड सरकारच्या ताब्यात आहे. त्याला भारतात आणण्यासाठी इंटरपोलने विशेष प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण मुन्नाने आपण पाकिस्तानी असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्याने आपले नाव मोहम्मद सालेम असल्याचेही सांगितले होते. पाकिस्ताननेही तो पाकिस्तानी असल्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे सादर केली होती.
त्यामुळे त्याला भारतात आणण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. त्याचे भारतीयत्व सिद्ध करणे हे मुंबई पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले होते. प्रत्यार्पण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी मग याचा पाठपुरावा केला. गेल्या महिन्यात त्यांनी अंधेरी न्यायलयातून मुन्नाच्या कुटुंबीयांच्या डीएनए चाचणीसाठी रक्ताचे नमुने घेण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही ते नमुने घेणे हे मोठे आव्हानात्मक काम होते. जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात झिंगाडाचे आई वडील बहिणी राहतात. त्याची पत्नी आणि मुले मात्र यापूर्वीच बँकॉकला गेली आहेत.
अशी घेतली डीएनए चाचणी
डीएनए चाचणीला मुन्ना झिंगाडाच्या कुटुंबियांनी तीव्र विरोध केला होता. जबरदस्तीने हे काम करणे अशक्य होते. झिंगाडाचे कुटुंबीय जेथे जाऊ शकतात त्या सर्व ‘गॉडफादर्स’ना आम्ही आधी तयार केले आणि त्यांचा मार्ग बंद केला.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने शालिनी वर्मा मेघवाडीत त्यांच्या कुटुंबियांपर्यत पोहोचल्या. या कुटुंबीयांवर जबरदस्ती केली असती तर त्यांनी पोलिसांवर आरोप केले असते आणि ही प्रक्रिया खोळंबली असती. पोलीस आपले ‘एन्काऊन्टर’ तर करणार नाहीत ना अशी भीती त्यांना वाटत होती. पण त्यांना विश्वासात घेऊन शालिनी वर्मा यांनी प्रकिया पार पाडली.
मुन्ना झिंगाडेचे आई-वडील आणि एका बहिणीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पुढील आठवडय़ात ते बँकॉकला पाठविण्यात येणार आहेत. न्यायालयातून अशा प्रकारचे आदेश प्रथमच मिळाल्याचे शर्मा म्हणाल्या. या मुळे मुन्ना झिंगाडाला भारतात आणण्याचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुन्ना झिंगाडाला पाकिस्तानचा नागरिक ठरवून त्याला पाकिस्तानमध्ये नेण्याचा तेथील यंत्रणेचा कट आहे. तेथे गेल्यावर मुन्ना झिंगाडाचा वापर भारताविरोधातच करण्यात येईल, हे उघडच आहे. मुन्ना झिंगाडा भारताच्या हाती लागला तर दाऊदच्या साम्राज्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, ही पाकिस्तानची खरी चिंता आहे. तर भारतात गेल्यावर छोटा राजनकडून मारले जाऊ अशी, भीती मुन्ना झिंगाडाला वाटते.

कोण आहे मुन्ना झिंगाडा़
मुज्जकिर मुद्देसर उर्फ मुन्ना झिंगाडा हा जोगेश्वरीच्या झोपडपट्टीत राहात होता. महाविद्यालयात असताना त्याने एका विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मुन्ना गुन्हेगारीकडे वळला. त्याचे गुन्हेगारी ‘कौशल्य’ पाहून दाऊदचा हस्तक छोटा शकीलची नजर त्याच्यावर गेली. त्याने त्याला पाकिस्तानमध्ये बोलावून घेतले. सांताक्रुझ पोलीस ठाण्यातून सुटल्यावर तो थेट पाकिस्तानात गेला आणि दाऊदसाठी काम करू लागला. ‘शार्प शूटर’ म्हणून मुन्ना प्रसिद्धीला आला. त्याच्यावर छोटा राजनला संपविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. २००० मध्ये त्याने बँकॉक येथे छोटा राजनवर हल्ला केला. तेव्हापासून तो थायलंड पोलिसांच्या कोठडीत आहे.

Story img Loader