इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश स्वतंत्र व्हावा, हेच क्रांतिवीर वि.दा. सावरकर यांचे ध्येय होते. त्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. सावरकरांच्या कल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी देशातील प्रत्येकाने त्यांच्या विचारानुरूप सहकार्य केले तर भारत शक्तिशाली झाल्याशिवाय राहणार नाही,
असे प्रतिपादन नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण दराडे यांनी केले.
स्वा. सावरकर स्मारक समितीतर्फे विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहात समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक ठाकरे यांच्या हस्ते ‘सामाजिक अभिसरण पुरस्कार’ प्रवीण दराडे व त्यांच्या अर्धागिनी आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांना तर ‘तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार’ श्रीकृष्ण शांती निकेतनच्या संचालिका प्रज्ञा राऊत यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक ठाकरे होते. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह असे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षीत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी ‘अभिनव भारत’ ही संघटना स्थापन केली. २३ व्या वर्षी त्यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली. त्यांना दोनदा जन्मठेप झाली. त्यांची विचारसरणी ही काळाच्या १०० पाऊले पुढे होती. प्रत्येक गोष्ट ते तर्काच्या कसोटीवर घासून बघत. त्यांचे विचार आजही अनुकरणीय आहेत, असेही दराडे यांनी सांगितले.
 राष्ट्रभक्ती काय आहे, हे सावरकरांच्या व्यक्तिमत्वातून दिसून येते. आजच्या तरुणांनी त्यांचे विचार जाणून घेण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. पल्लवी दराडे यांनी व्यक्त केले. सत्कारामुळे अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. हा पुरस्कार मिळाल्याने आणखी जबाबदारी वाढली आहे. इतरांना मदत करायचे हे आई-वडिलांकडून शिकले. शासनाच्या सेवेत राहून सामाजिक कार्य करता येते, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. ‘कर्म करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका’, या गीतेतील तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन श्रीकृष्ण शांती निकेतनच्या माध्यमातून अपंग, निराधार, मतिमंदांची सेवा करीत असल्याचे प्रज्ञा राऊत यांनी सांगितले. सध्या बेलतरोडी व वर्धा जिल्ह्य़ातील आर्वी येथे या संस्थेच्या शाखा आहेत. या शाखा विना अनुदान तत्त्वावर चालत आहेत. अमरावती येथे तिसरी शाखा उघडण्याचा मानस आहे. समाजाने आपल्यासाठी काय केले, यापेक्षा समाजासाठी आपण काय करू शकतो, या जाणिवेतूनच हे कार्य अखंडपणे सुरू आहे. या कार्यास पती प्रमोद राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
डॉ. ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे प्रचार, प्रसार करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक अभिसरण पुरस्कार व तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार देण्यात येत असल्याचे सांगितले. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी सत्कारमूर्तीचा परिचय करून दिला. संस्थेचे महासचिव मुकुंद पाचखेडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. अंकिता पाचखेडे हिने संचालन तर शिरीष दामले यांनी आभार मानले. प्रशांत उपगडे यांनी गायिलेल्या वंदेमातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास प्रसिद्ध साहित्यिक वि.स.जोग, प्रा. प्रमोद सोहनी, अजय आचार्य, माधुरी साकुळकर, पल्लवी फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader